भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने काशिमीराच्या माशाचा पाडा येथील मेसर्स आरडीसी काँक्रीट या रेडी मिक्स काँक्रीट प्लांट येथील एका शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर बंद करण्याचा आदेश दिला होता, त्याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पालिकेचा तो आदेश रद्दबातल ठरवित तो आदेश नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याचे कडक शब्दांत ताशेरे ओढले.
माशाचा पाडा येथील मेसर्स आरडीसी काँक्रीट प्लांटजवळ एका शाळकरी मुलाचा आरएमसी मिक्सर वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना 11 सप्टेंबर रोजी घडली होती. पालिकेने दुसऱ्या दिवशी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावित तो प्लांट बंद करण्याचे आदेश दिले. मात्र ज्या वाहनाने मुलाला धडक दिली होती ते वाहन आरडीसी काँक्रीट या कंपनीचे नव्हते, तरी पालिकेने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविल्याचा दावा कंपनीने केला आहे.
वास्तविक हे वाहन नायगावच्या ससुनवघर येथील एका आरएमसी प्लांटमधील होते. ते अत्यावश्यक बाब म्हणून आरडीसी प्लांटमध्ये आरएमसी भरण्याकरीता आले होते. आणि त्याच वाहनाच्या धडकेत त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांसह राजकीय मंडळींनी आंदोलन छेडल्याने पालिकेने आरडीसी काँक्रीट या प्लांटवरच कारवाई करून तो बंद करण्याचा आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यामागची वस्तुस्थिती पडताळून न पाहता पालिकेने लोकांच्या दबावापोटी त्या प्लांटला तात्काळ बंद केल्याने कंपनीने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीवेळी कंपनीने पालिकेकडून बजाविण्यात आलेल्या नोटिसीत आरएमसी प्लांट नियमांचे उल्लंघन करत कार्यरत असल्याचे म्हटले होते.
पालिकेने प्लांटचा परवाना रद्द करीत तो सील केला होता, पालिकेने बजाविलेल्या नोटिसीला कंपनीने 15 सप्टेंबर रोजी उत्तर दिले. त्यात शाळा प्लांटच्या 200 मीटरच्या आत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पालिकेने कंपनीची 30 सप्टेंबर रोजी सुनावणी आयोजित करून प्लांटला पुन्हा बंद करण्याचे आदेश कायम ठेवीत त्याचा परवाना रद्द केला यावरून कडक शब्दांत ताशेरे ओढले.