

पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्हा पाणीटंचाई मुक्त व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहे. यासाठीचे युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरू आहेत.मात्र तरीसुद्धा काही केल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई थांबत नसल्याचे दिसून येत आहे.जलजीवन योजनेमुळे बऱ्याच अंशी पाणीटंचाई कमी झाली असली तरी अद्यापही तिचे समूळ उच्चाटन झाले आहे असे चित्र दिसून येत नाही. कारण की आज घडीला मार्च महिन्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाली असून जिल्ह्यात एकूण बारा पाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सात टँकरने दररोज 12 ते 13 फेऱ्या चालू असून या गावपाड्यांची तहान भागविली जात आहे. मात्र ही पाणीटंचाई येत्या काही महिन्यात अधिक वाढण्याची दाट शक्यता असून पुढील दोन महिने कडाक्याचे ऊन असल्याने अनेकदा गावाजवळील नैसर्गिक पाणीसाठे वाटण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील टोकरे पाडा जांभूळपाडा मोखाडा मधील धामोडी गोळीचा पाढा डोंगरवाडी, हेदवाडी, जव्हार तालुक्यातील रेठीपाडा, सागपाना, काळीधोंड, कुंडाचापाडा, खरंबा आणि तळ्याचा पाडा अशा एकूण बारा पाड्यांना सध्या पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई फेब्रुवारी महिन्यातच सुरू झाल्याने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे .या गावपाड्यातील लोकसंख्या पाहता 6 हजार 691 तर या पाड्यातील पशुधनाची संख्या 1 हजार 974 इतकी आहे. जिल्ह्यातील बाकी गावपाड्यांच्या तुलनेने जव्हार तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 6 पाड्यांना ही पाणीटंचाई दिसून येत आहे तर वाडा तालुक्यात 2 आणि मोखाडा तालुक्यातील 4 पाड्यांना ही टंचाई आहे. यातील जव्हार तालुक्यात तर जानेवारी महिन्यातच टँकर सुरू झाले होते. यामुळे आज घडीला ही परिस्थिती पाहता पुढील दोन महिन्यात टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढून भीषण पाणीटंचाईला प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे जलजीवन योजनेच्या यशस्वी ते बद्दल देखील आता शंका उपस्थित होत आहे.
या टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावपाड्यातील नागरिकांना टँकरची वाट बघत आपल्या हातातील कामे सोडून पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. कारण की ज्या विहिरींमध्ये हे पाणी सोडले जाते ती विहीर सहसा गावपाड्यांपासून अर्धा ते एक किलोमीटर किंबहुना काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त अंतरावर असतात. यामुळे महिला भगिनींना टँकर आल्यानंतर जास्तीत जास्त पाणी कसे भरता येईल या विवंचनेतून संपूर्ण कुटुंबाला या पाण्यासाठी धावावे लागते. याशिवाय दुपारी उन्हाचा तडाखा अधिक असल्याने एक तर पहाटे लवकर किंवा मग सायंकाळी टँकरने पाणी विहिरीत सोडण्यात येते. तर काही ठिकाणी टँकर ने सोडलेले पाणी संपल्यानंतर त्यावेळी हजर नसलेल्या कुटुंबांना विहिरीतून पाझरणारे अगदी तळाशी गेलेल्या पाणी मिळवताना एक वेगळा संघर्ष करावा लागत असल्याचे देखील दिसून येत आहे. यामुळे पाणीटंचाईमुक्त पालघर जिल्ह्यासाठी पाण्यासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक बनले आहे. दरम्यान कोणत्याही पाणी पुरवठा योजनेचे काम करताना त्या योजनेचा मुख्य गाभा हा जलस्रोत असलेला हवा जेणेकरून ते गाव पाडे पाणीटंचाई मुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आकडा पाहता नेहमीच मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई असल्याचे आजवर जाणवत होते. मात्र आज मार्च महिन्यातील आकडेवारी पाहता मोखाडा तालुक्यात चार तर जव्हार तालुक्यात सहा गावपाड्यांना जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नुसत्या मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या शंभरी पार करत होती. मात्र जीवन योजनेमुळे हा आकडा अतिशय कमी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. मुळात जिल्ह्यातील इतर तालुक्यातील योजनांची तुलना मोखाडा तालुक्यातील मोखाड्यातील जलजीवन योजना प्रभावी ठरणार असल्याचे दिसून येते. कारण की मोखाडा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी मध्य वैतरणा येथून पाणीपुरवठा होत असल्याने मुबलक प्रमाणात पाण्याचा स्रोत तालुक्याच्या या योजनेला मिळाला आहे. तरी इतर तालुक्यात गाव पाड्यांची स्वतंत्र योजना असल्याने खोदलेल्या सर्वच विहिरींना पाण्याचा स्रोत किती मिळणार हा संशोधनाचा भाग आहे.