

Virar Pothole Accident
विरार : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यांच्या भीषण दुरवस्थेमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. विरार (पूर्व) आर.टी.ओ. कार्यालयाजवळ आज (दि.२२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रताप नाईक (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते तांदूळ बाजारकडून विरार फाट्याकडे दुचाकीवरून जात होते. मार्गातील मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी अडकल्याने ते खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या टँकरखाली ते चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्यातून होत असलेले मृत्यू याबाबत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
"रस्त्यावरील खड्डे बुजवले असते, तर हा बळी गेला नसता. नवरात्रीच्या सुरूवातीलाच एक जीव गेला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आमचा संताप रस्त्यावर व्यक्त करू."
- संगीता पटेल, स्थानिक नागरिक