

सफाळे : प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची व दिलासादायक बातमी असून पश्चिम रेल्वेने विरारसुरत मेमू गाडी आता एका टप्प्यात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रेस रिलिजनुसार दि. 3 जानेवारी 2026 पासून गाडी क्रमांक 69141 विरार-सुरत मेमू ही सकाळी 5.15 वाजता विरारहून सुटून सकाळी 10.30 वाजता सुरतला पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 69142 सुरतविरार मेमू ही गाडी सुरतहून सायंकाळी 5.30 वाजता सुटून रात्री 11.30 वाजता विरारला पोहोचणार आहे.
यापूर्वी हीच गाडी दोन टप्प्यांत धावत होती. 69143 विरार-संजाण मेमू पाच मिनिटे संजाण येथे थांबून 69141 संजाण-सुरत मेमू म्हणून धावत होती, तर 69142 सुरत-संजाण मेमू पाच मिनिटे थांबून 69144 संजाण-विरार मेमू म्हणून चालवली जात होती. त्यामुळे प्रवाशांना गोंधळ व गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांच्या सोयीसाठी आता थेट विरारसुरत आणि सुरतविरार अशी एकाच टप्प्यातील सेवा सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. मात्र या गाडीचे एकूण अंतर सुमारे 207 किलोमीटर असल्याने, या मेमू गाडीचे तिकीट सामान्य पॅसेंजर ट्रेनप्रमाणे आकारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
एका टप्प्यात ही गाडी धावणार असल्याने प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याच धर्तीवर 90667 दादर-विरार आणि 93033 विरार-डहाणू या दोन टप्प्यांत धावणाऱ्या लोकल सेवाही थेट दादर-डहाणू सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. डहाणू विभागातील प्रवाशांना, विशेषतः नवीन प्रवाशांना, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दादर स्थानकात लोकलची उद्घोषणा डहाणू लोकल अशी होत नसल्याने गोंधळ उडतो. तसेच विरार स्थानकात उतरणारे आणि डहाणूकडे जाणारे प्रवासी यांच्यात नेहमीच बाचाबाची होते. याचा त्रास वयोवृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना अधिक सहन करावा लागतो. एकाच गाडीला दोन टप्प्यांत चालवण्याऐवजी थेट एका टप्प्यातील रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.