

खानिवडे: वसई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे रस्त्यावरून जात असलेल्या एका अवजड 'आयवा' ट्रकला भीषण आग लागून ते वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. वसई पूर्वेकडील शिरसाड-अंबाडी रस्त्यावर शिरवली गावच्या पूर्णांक पाडा येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अवजड वाहतूक करणारा एक 'आयवा' ट्रक अंबाडीच्या दिशेने जात असताना शिरवली येथील पूर्णांक पाडाजवळ पोहोचला. त्यावेळी गाडीतून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच, त्याने प्रसंगावधान राखत त्वरित ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवला. मात्र, तोपर्यंत ट्रकने पेट घेतला होता आणि काही क्षणातच तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
चालकाने तत्काळ ट्रकमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला आणि या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच, पारोळ बीट चौकीच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की, त्याने संपूर्ण ट्रकला आपल्या कवेत घेतले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आणि मोठ्या शर्थीने या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण 'आयवा' ट्रक जळून खाक झाला होता.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. इंजिनमधील बिघाड, टायर गरम झाल्याने किंवा बॅटरी वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, या घटनेत ट्रक जळून खाक झाला असला तरी, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.