

पालघर: पालघर जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असून वाढवण बंदरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.याचाच सकारात्मक परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील मुंद्राक शुल्क विभागाने सरत्या आर्थिक वर्षात एकूण 1648 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा दीडशे कोटी रुपये अधिकची रक्कम गोळा करून दहा टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
राज्य शासनाने पालघर जिल्ह्यासाठी निर्धारित केलेल्या मुद्रांक शुल्क इष्टांका पेक्षा अधिक महसूल गोळा करण्याची कामगिरी जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाने केली आहे. 1550 कोटी रुपये महसूल गोळा करण्याचा इष्टांक असताना मुद्रांक शुल्क विभागाने सरत्या आर्थिक वर्षात एकूण 1648 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा केले आहेत.
गेल्यावर्षी पेक्षा दीडशे कोटी रुपये अधिकची रक्कम गोळा करून दहा टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जिल्ह्यात वाढवण बंदर,विमानतळ सारखे नवनवीन प्रकल्प येऊ घातल्याने आगामी काळात मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ होणार आहे.
सरलेल्या आर्थिक वर्षात पालघर जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाकडे एकूण 91 हजार 299 दस्तऐवज नोंदणी करण्यात आले, ज्यामुळे 1648.69 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. जिल्हा मुद्रांक अधिकारी प्राची घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे चौदाशे कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेचा महसूल गोळा करण्यात मुद्रांक शुल्क विभागाला शक्य झाले.
मुद्रांक जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या पासून प्राची घोलप यांनी जिल्ह्यातील दस्त नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. मुद्रांक शुल्क विभागा कडून राबवलेले उपक्रम आणि जिल्ह्यात विविध राष्ट्रीय प्रकल्पांमुळे मुद्रांक शुल्क वसुली रकमेत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा प्रशासन आणि मुद्रांक शुल्क विभागाने दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेस ऑनलाइन सुविधा आणि जनजागृतीमुळे करदात्यांचा सहभाग वाढला. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय प्रकल्पामुळे मुद्रांक वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यात मुद्रांक शुल्क माध्यमातून महसुलाच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या विकासात मुद्रांक शुल्क अंतर्गत मिळणारा महसूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
चौथी मुंबई
वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई उभी राहत आहे. यासाठी 107 गावातील 512 चौ .कि.मी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यसरकारडे सादर केला आहे. त्यानूसार उभ्या राहणाऱ्या चौथ्या मुंबईमुळे पालघर जिल्ह्याचा मोठा आर्थिक विस्तार होणार आहे. यामध्ये वाढवण बंदरामार्गे आलेल्या मालाला साठवण्यासाठी लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहे. या बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा वाढेल. त्या पार्श्वभुमीवर पंचतारांकित हॉटल उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेट फ्रेट कॉरिडॉर दरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपुरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटड फ्रेट कॉरिडॉर असेल.एकूणच नव्याने उभ्या राहणाऱ्या चौथ्या मुंबईमुळे पालघरचा विकास झपाट्याने होणार आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई बडोदा दृतगती महामार्ग,बुलेट ट्रेन,लोकल रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, विरार अलिबाग कॉरिडोर सारखे प्रकल्प आणि वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आणी विमानतळाच्या घोषणेमुळे दस्त नोंदणीची संखेत वाढ झाली आहे.भविष्यात दस्त नोंदणीत वाढ होणार असून जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क विभागाकडून पक्षकारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- प्राची घोलप, मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर.