

पालघर ः पालघर सिन्नर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160(अ) ची खड्ड्यांमुळे चाळण झाली असुन मनोर पालघर पर्यंतच्या वीस किलोमीटर अंतर तसेच जव्हार फाट्या पासून पाचमाड पर्यंतचा रस्त्याची दुरावस्था झाली आहे.पावसाळ्यात महामार्गाची देखभाल दुरुस्तीच्या कामात सातत्य नसल्याने खड्ड्यांची संख्या वाढली आहे.खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गा प्रमाणे पालघर सिन्नर रस्त्याचा दर्जा राखण्यात महामार्ग विभागाला अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
भोपोली भागातील क्रशर उद्योगांमधील खडी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणार्या शेकडो ओव्हरलोड ट्रक महामार्गावरून धावत असल्यामुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत असून धुळीमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
पालघरमध्ये जिल्हा मुख्यालय झाल्यापासून मनोर पालघर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. नंडोरे नाका, डुंगीपाडा, गणेश नगर, घोलविरा भागात मोठ्या संख्येने रहिवासी इमारती उभ्या राहिल्याने नागरी वस्तीत वाढ झाली आहे. रस्त्यालगत सेंट जॉन कॉलेज आणि वेवुर भागात औद्योगिक वसाहत असल्याने विद्यार्थी तसेच कामगारांची मनोर पालघर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.पालघर पूर्वे कडील औद्योगिक वसाहती मध्ये अवजड वाहने मोठ्या संख्येने येत असतात.
बुलेट ट्रेन आणि रेल्वे चौपदरीकरणा सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि खडी पावडर सारख्या गौण खनिजाची वाहतूक मनोर पालघर रस्त्यावरून वाढली आहे. विक्रमगड तालुक्यातील भोपोली, केव फाटा, बांगरचोळा भागात क्रशर मशीन मधून खडी वाहतूक करणार्या ट्रकची संख्या मोठी आहे. पावसाच्या पाण्याच्या निचर्याची व्यवस्था नसल्याने जव्हार फाटा ते पाचमाड पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने नेमलेल्या कंत्राटदारा कडून केलेले दुरुस्तीचे काम दर्जा उघडा पडला असुन पावसाळ्याच्या तीन महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांची संखेत वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे महामार्ग धोकादायक झाला आहे. जव्हार फाटा ते भोपोली तसेच मनोर ते पालघर दरम्यानच्या वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांची संख्या मोठी आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांची गैरसोय होत असल्याने महामार्गावरील खड्डे बुजवून तात्काळ दुरुस्तीची कामे सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 106 अ ची देखभाल दुरुस्तीचे काम पाहणार्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय वसईमध्ये आहे. अभियंत्यांसोबत संपर्क आणि पत्रव्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनोर स्थित गोदामाची जागा निश्चित करण्यात आली होती. पुढे कार्यवाही झाली नाही.
पालघर ते विक्रमगड पर्यंतच्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे.डांबर प्लांट बंद असल्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडचण येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पहिली जात आहे.लवकरच खड्डे बुजवून आणि डांबरीकरण केले जाईल.
निलेश जाधव, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग