Palghar News : अखेर शिरसाड वज्रेश्वरी रस्त्याचे काम सुरू
खानिवडेः राज्य मार्ग म्हणून खूप जुना असलेल्या वसई पूर्वेतील शिरसाड-वज्रेश्वरी हा अत्यंत दयनीय अवस्थेत असलेला रस्ता आता चर्चेत आला आहे. याबाबत वारंवार दैनिक पुढारीने या गंभीर समस्येवर केलेल्या ठळक बातमीचा परिणाम दिसू लागला आहे. केवळ दोन दिवसांपूर्वी म्हणजे 15डिसेंबर रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केवळ सात वर्षांच्या एका निष्पाप लहान मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. तो आपल्या आई वडिलांसोबत प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात दर्शनासाठी जात असताना एका खड्डयाला वाचवताना त्यांची दुचाकी घसरून हा अपघात घडला होता.
या दुर्घटनेनंतर नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. रस्ते बांधकाम प्रशासनासह सत्ताधारी व स्थानिक लोकप्रतिनिधीवर अक्षम्य दूर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने प्रशासनाचे लक्ष वेधत वास्तव परिस्थिती मांडली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे.
सध्या या रस्त्यावर खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे व तात्पुरती डागडुजी केली जात आहे.मात्र नागरिकांनी कायमस्वरूपी व दर्जेदार निर्धोक रस्ता करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम पूर्ण करावे, तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने या रस्त्यावर लक्ष घालावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

