

केळवा रोड : विजय घरत
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे उलटून गेली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत, "हर घर जल" सारख्या योजनांचा गाजावाजा केला जात आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील सफाळे विटीलाईन परिसरातील अनेक गावांमध्ये आजही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
टेंभीखोडावे, विठ्ठलवाडी, विराथन बुद्रुक, चिखलपाडा, जलसार, दारशेत पाडा, खोडावेपाडा, किराई पाडा, तलाव पाडा यांसह सुमारे १७ गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. विशेष म्हणजे या गावांना शासनाकडून ‘टँकरमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या परिसरातील शासनाच्या अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. तसेच १७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या करवाळे धरणाकडूनही अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. परिणामी फेब्रुवारी ते जून या कालावधीत महिलांना व ग्रामस्थांना अनेक किलोमीटर अंतर पार करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक आमदार, खासदार आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दरम्यान, या भीषण पाणीटंचाईच्या काळात माकणे गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश गावड यांनी पुढाकार घेत स्वतःच्या स्वखर्चातून टेंभीखोडावे गावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
मात्र, नागरिकांचा प्रश्न कायम आहे. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असताना स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या भागासाठी कायमस्वरूपी व शाश्वत पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.