Palghar Political News | स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविआचा कस लागणार

Mahayuti vs MVA | पालघरमध्ये महायुतीचे महाविकास आघाडीला मोठे आव्हान
Palghar Political News
Palghar Election (File Photo)
Published on
Updated on

Palghar Political Parties

पालघर : निखिल मेस्त्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनामार्फत निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जमवाजमवी करायला सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी यांचे वर्चस्व असताना अलीकडच्या खासदार, आमदारकीच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मुसंडी मारून पालघरच्या राजकारणातील आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीला या निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व आणण्यासाठी महायुतीशी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे. जिल्ह्यात आगामी काळात महायुतीचे आव्हान महाविकास आघाडी समोर उभे असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.

Palghar Political News
Palghar News | पालघर पंचायत समितीच्या कार्यालयात आग; महिला बाल विकास विभाग जळून खाक

पालघर जिल्हा हा तसा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप अशा पक्षांचे संख्याबळ असलेला जिल्हा होता. दोन-तीन वर्षांपूर्वी पक्षांच्या फाळणीनंतर महाविकास आघाडी व महायुती अस्तित्वात आली. पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीसह बहुजन विकास आघाडीचे चांगले वर्चस्व होते. महाविकास आघाडी महायुतीला चांगली टक्कर देईल असे चित्र असताना खासदारकीच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर हेमंत सवरा हे भरघोस मतांनी विजयी झाले. त्यापाठोपाठ आमदारकीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीला पालघर जिल्ह्यात भुईसपाट केले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला केवळ माकपचा एक आमदार निवडून आला. या घडामोडीनंतर पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आले. इतकेच नव्हे तर तीन आमदारांच्या जोरावर नेहमी चर्चेत व सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले बहुजन विकास आघाडीचे सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवारांसमोर पराजित झाले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे बळ कमकुवत झाले.

Palghar Political News
Palghar Politics | पालघरमध्ये भाजपला धक्का; माजी आमदार अमित घोडा यांची शिवसेनेत घरवापसी

पालघर जिल्ह्यात सध्या महायुतीच्या भाजपाचा एक खासदार, तीन आमदार असून शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यावर महायुतीची पकड आणखीन घट्ट झाली आहे. महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या काही काळात महायुतीच्या पक्षांकडे पक्षांतर करत आहेत. या प्रकारामुळे महाविकास आघाडीचे बळ कमी होत चालले आहे. सत्ता केंद्री असलेल्या महायुतीकडून पालघर जिल्ह्याला भरघोस निधी उपलब्ध करून देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांसमोर महाविकास आघाडीचे प्रयत्न फारच तोकडे पडत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते आपापल्या परीने मतदार टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत, तर दुसरीकडे या मटक पक्षातील ठाकरे गटाच्या पक्ष नेतृत्त्वाच्या अभावी या पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडू लागला आहे. वारंवार बदलणारे पदाधिकारी, समन्वयाचा अभाव व न पुरवलेली रसद या कारणांमुळे ठाकरे गट पालघर जिल्ह्यात कोलमडून पडला आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आपापले मतदारसंघ राखण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत. पारंपारिक असा मतदारसंघ राखण्याचा प्रयत्न माकपकडूनही केला जात आहे.

Palghar Political News
Palghar Shiv Sena Dispute | पालघरमध्ये शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाकडे पाठ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेचे वर्चस्व होते. अर्थात जुन्या शिवसेनेतून नव्या शिवसेनेत सर्व सदस्य पक्षांतर करून आले होते, जिल्हा परिषदेतील विविध गटात सत्ताधारी महायुतीचा फायदा करून घेण्यात शिवसेना वरचढ ठरण्यासाठी गट व गणांमध्ये प्रयत्न केले जात आहेत. विविध स्पर्धांचे आयोजन, हळदीकुंकू कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांमध्ये इच्छुक उमेदवार गुंतलेले आहेत. महायुतीकडून हे प्रयत्न सुरू होत असताना महाविकास आघाडी मात्र पिछाडीवर पडल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीला एक हाती सत्ता मिळेल अशी अपेक्षा आहे. तर महाविकास आघाडीला महायुतीच्या उमेदवारांचे मोठे आव्हान असणार आहे.

इच्छुक उमेदवार आतापासूनच लागले तयारीला

सध्या महायुतीच्या घटक पक्षांकडे उमेदवारांचे चेहरे नाहीत. या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्यापासून चे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहणार आहेत. पंचायत समिती गणांमध्येही साधारणतः हीच परिस्थिती दिसून येत आहे. महायुतीचे इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र या तयारीपासून खूप दूर असल्याचे दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या शिवसेनेचे उमेदवार हे जुन्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र आता ते महायुतीतर्फे लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार व चेहरे उभे करण्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे.

आमदारकीच्या निवडणुकीत बविआ पिछाडीवर

पालघर जिल्ह्यात वसई विरार शहर महानगरपालिका ही मोठी पालिका आहे. वसई, नालासोपारा, बोईसर मतदार संघामध्ये यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. या तिन्ही मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार कार्यरत होते. त्यामुळे या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे एक हाती वर्चस्व होते. मात्र गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला एकाही जागेवर आमदार निवडून देता आला नाही. स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा या निवडणुकीत पराजित झाले. वसई तालुक्यातील नालासोपारा व वसई या दोन मतदारसंघांमध्ये भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आता बविआ प्रवाहात राहिली नसल्यामुळे महानगरपालिकेवर भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करेल अशी चर्चा एकीकडे असली तरी बहुजन विकास आघाडी महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळेल असे सांगितले जात आहे. मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी भाजपच्या दोन्ही आमदारांनी विकास काम व इतर कामांसाठी आग्रही राहून महापालिकेत चर्चेत राहण्याचे काम केल्याने बहुजन विकास आघाडीला कितपत निवडणुकीत यश मिळेल हे येणारा काळच सांगणार आहे.

प्रत्येक गट, गणामध्ये, प्रभागमध्ये महायुती ताकतीनिशी उतरणार

पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व असताना सत्ता व पक्ष बदल घटनांमध्ये महायुतीने येथे शर्तीचे प्रयत्न करून महाविकास आघाडीला धूळ चारली. आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी आपले पाय आणखीन घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला धक्का पोहोचू लागला आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेतृत्वाच्या व समन्व्य अभावामुळे मतदारांवरील व पक्ष संघटनेच्या वाढीची पकड सैल होऊ लागली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसह बहुजन विकास आघाडीला महायुतीशी संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक गट व गणामध्ये व प्रभागमध्ये महायुती ताकतीनिशी उतरणार असून त्याच्या मुकाबल्यासाठी महाविकास आघाडीला अधिक ताकद पणाला लावावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news