

पालघर : पर्यटन स्थळावरील बंदीमुळे वर्षा पर्यटनासाठी पालघर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर येणार्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. दुर्घटना रोखण्यासाठी वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाणार्या रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांकडून पर्यटकांची काटेकोर चौकशी केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ वगळता सरसकट पर्यटकांना माघारी पाठवले जात आहे.
मनाई आदेश जारी झाल्याच्या दिवसापासून मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर आणि गुजरात राज्यातील पर्यटकांना माघारी पाठवल्याची माहिती बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्यांनी दिली. मनाई आदेशा बाबत माहिती नसल्याने लांबून येऊन माघारी फिरावे लागत असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
वर्षा पर्यटना दरम्यान घडणार्या दुर्घटना रोखण्यासह पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वांद्री धरण, तांदुळवाडी आणि वाघोबा खिंडीतील धबधबा परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहे..बंदी काळात पर्यटकांना वांद्री धरण, तांदुळवाडी आणि वाघोबा खिंडीतील धबधबा परिसरात मनाई करण्यात आली असून बंदी आदेश मोडणार्या पर्यटकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. 22 जुलै 2025 पासून 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील वांद्री धरण, धरणाचा सांडवा आणि ठाकूर पाडा धबधब्याच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजदार नितीन भालेराव, पोलीस अंमलदार अक्षय पर्हाड आणि संजय शेगर यांच्या पथकाकडून पर्यटकांची चौकशी करून त्यांना माघारी पाठवण्याचे काम सुरु होते.
पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील गांजे-ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण तसेच धरणा परिसर तसेच धरणाच्या सांडव्यातुन ओव्हरफ्लो होऊन वाहणार्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्याकरीता मोठया संखेने पर्यटक धरण परिसरात येतात. सांडव्यातुन ओव्हरफ्लो होणार्या पाण्या सह धरणाच्या पाण्यात उतरून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. वांद्री धरणाच्या पाण्यात बुडुन गेल्या तीन वर्षात ( 2023 ते 2025) सात जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान तांदूळवाडी चहाडे रस्त्यावरील तांदुळवाडी धबधबा तसेच पालघर मनोर रोडवरील वाघोबा खिंडीतील धबधब्याखाली बसुन भिजण्यासह पर्यटक धबधब्याच्या उगम स्थानाकडे जाण्याची जोखीम पत्करतात. फोटो काढण्यासाठी पर्यटक वाहत्या पाण्यात उतरत असल्याचे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.