

पालघर: दोन महिन्यांमध्ये पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाल्याने सूर्या प्रकल्पामधील धामणी कवडास धरणे भरली आहेत. धामणी धरणामध्ये एक जून पासून 2015 मिलिमीटर तर कवडास धरणामध्ये 1332 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वांद्री मध्यम प्रकल्पामध्येही पावसाची चांगली नोंद झाली असून ती 1332 इतकी आहे. सद्यस्थितीत धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून 3336 क्युसेक्स पाणी सांडव्यातून सोडले गेले आहे
धामणी धरणाची क्षमता 276.350 इतकी असून कवडास धरणाची क्षमता 9.960 इतकी आहे. तर वांद्री धरणाची क्षमता 35.938 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सद्यस्थितीत धामणी धरणामध्ये 225.601 दलघमी, कवडास धरणामध्ये 4.460 दलघमी तर वांद्री धरणामध्ये 22 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. टक्केवारी लक्षात घेता धामणी धरण 81% च्या जवळपास, कवडास धरण 44% च्या जवळपास तर वांद्री धरण 63% च्या जवळपास भरले आहे.
जिल्ह्यात सूर्या अर्थात मासवण नदी, वैतरणा, पिंजाळ, आणि देहर्जा अशा नद्या असून सूर्या नदीची इशारा पातळी 11 मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत 3.28 मीटर पातळी या नदीची आहे. वैतरणा नदीची इशारा पातळी 101.90 इतकी असून सध्या तिची पातळी 99.60 मीटर इतकी आहे. पिंजाळ नदी इशारा पातळी जवळ येऊन पोचली आहे. तिची इशारा पातळी 102.75 इतकी असून सध्या 101.60 मीटर अशी पातळी नदीची आहे.देहरजा नदी 98.75 मीटर इशारा पातळीवर असून आता 94.62 मीटर पातळी नदीची आहे.
पालघर जिल्ह्यात धामणी, कवडास, वांद्री ही प्रमुख धरणे असून मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, देवखोप आणि मोह खुर्द हे बंधारे आहेत. जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पातील धामणी आणि कवडास धरणातून डहाणू, बोईसर, पालघर, वसई-विरार महानगरपालिकासह अदानी औष्णिक वीज प्रकल्प, तारापुर अणूऊर्जा प्रकल्प, तारापुर एमआयडीसी या सारख्या मोठ्या उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. सोबतच जिल्ह्यातील इतर लहान धरणांवर गावपाड्यातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरण प्रकल्पातून डहाणू आणि पालघर तालुक्यातील पाच हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीला सिंचनाचे पाणी पुरविले जाते. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. एक जून ते 23 जुलै या कालावधीत गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात 1252.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महीन्याची पावसाची सरासरी 2309.4 मिमी जवळपासची आहे. जून महिन्यामध्ये आठ तालुक्यांची पावसाची सरासरी 411.9 होती मात्र या महिन्यात प्रत्यक्षात 577.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली अर्थात या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 140% पाऊस जास्त झाल्याची नोंद झाली जुलै महिन्याची पावसाची सरासरी 671.5 मिलिमीटर इतकी आहे आत्तापर्यंत 434.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.