

पालघर शहर : पालघर नगरपरिषद हद्दीतील ४९ इमारती धोकादायक असून या इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही या इमारती नागरिक, रहिवासी रिकाम्या करत नसल्याने एखाद्या इमारतीत दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
पालघर नगरपरिषद हद्दीतील ४९ इमारती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. या धोकादायक इमारतींमध्ये बीएसएनएल इमारत, टेलिफोन एक्स्चेंज, शेरबानु अपार्टमेंट, बृजवासी हॉटेल, गुजराती शाळा, फैजमल चाळ, नंदभुवन अपार्टमेंट, कौशिक मिश्रा यांची इमारत व जिल्हा परिषदेची शाळा अशा इमारतींचा समावेश आहे.
शैक्षणिक, व्यावसायिक व सरकारी इमारतींसह इतर इमारती धोकादायक आहेत. पालघर नगरपरिषदेने ४९ इमारती अतिधोकादायक, धोकादायक व राहण्यास अयोग्य असून याबाबत नोटीसी देखील बजावल्या. मात्र त्यानंतरही या इमारतीमध्ये रहिवासी याकडे दुर्लक्ष करून इमारतीत वास्तव्य करत आहेत. पालघर रेल्वे स्थानाकसमोर पालघर नगरपरिषदेच्या मालकीची इमारत देखील जीर्ण व धोकादायक आहे.
कार्यालयीन वापरासाठी ही बंद असली तरी तळमजल्यावर अजूनही दुकाने सुरू आहेत, वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठेत असलेल्या धोकादायक इमारती एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता नगरपरिषदेने याबाबत ठोस पावले पावले उचलून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. एकूणच विरार येथील दुर्घटनेनंतर आता प्रशासनाने या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दरम्यान विरार येथे रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेत घडली १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.