

नविद शेख
पालघर: नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील मासवण येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिन्याच्या कालावधीत आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व्यवस्थेसह आश्रमशाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मासवण अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा श्रेयांश शैलेश आंबात (वय ६ वर्षे) याला शनिवारी ताप आल्याने उपचारासाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या रक्ताच्या तपासण्या केल्या असता डेंग्यू आणि मलेरिया नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर तापावरील औषधोपचार करून त्याला पुन्हा आश्रमशाळेत पाठवण्यात आले होते.
मात्र सोमवारी सकाळी न्याहारी केल्यानंतर सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला तपासणीसाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेतच त्याची प्रकृती गंभीर झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांची गरज असल्याने ऑक्सिजनची व्यवस्था करून रुग्णवाहिकेतून त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आश्रमशाळेत धाव घेतली. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता तब्बल २६ विद्यार्थ्यांमध्ये ताप सदृश्य लक्षणे आढळून आली.
सुरुवातीला आश्रमशाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
दरम्यान, याच आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या रिया मनु हाडळ या विद्यार्थिनीचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. आजारी असल्याने पालक तिला घरी घेऊन गेले होते. मात्र घरी उपचार सुरू असताना प्रकृती अधिक बिघडल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला होता.
मासवण येथील या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २२० विद्यार्थी आणि २३० विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच आश्रमशाळेच्या वसतिगृहात ३९४ विद्यार्थी वास्तव्यास असून त्यात २०० विद्यार्थी आणि १९४ विद्यार्थिनी आहेत.
दरम्यान, विक्रमगड तालुक्यातील संदीप सखाराम गवळी यांनी आश्रमशाळेच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मुलीला शनिवारी ताप आला होता, मात्र याची माहिती शिक्षकांनी पालकांना दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.
अन्य एका पालकाकडून माहिती मिळाल्यानंतर ते आश्रमशाळेत पोहोचले असता त्यांची मुलगी झोपलेल्या अवस्थेत होती. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुलीला ताब्यात घेऊन खासगी रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर सोमवारी तिला मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आश्रमशाळेतील शिक्षक, अधीक्षक आणि संबंधित कर्मचारी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत पालकांना वेळेवर माहिती देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. महिनाभरात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे आश्रमशाळेतील आरोग्य सुविधा, विद्यार्थ्यांची नियमित तपासणी आणि प्रशासनाची कार्यपद्धती याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.