

पालघर : वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे पालघर तालुक्यातील मनोर परिसरासह विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये राहत्या घरांच्या छतावरील पत्रे उडाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, झाडे उन्मळून पडल्याने तसेच वीज खांब कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दोन आठवड्यांच्या पावसाच्या खंडानंतर बुधवारी रात्री पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.दरम्यान पालघर तालुक्यातील २०० तर विक्रमगडमधील १०० अशा ३०० घरांचे यात नुकसान झाले आहे.
पालघर तालुक्यातील मनोर, सावरखंड, टाकवहाल, पोळे, नवी दापचरी आणि बोरांडा, कोसबाड आदी गावांमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील नाळशेत, शीलशेत, केव, म्हसरोळी परिसरातील शेकडो घरांच्या छतांचे पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरालगतची मोठी झाडे कोसळून घरांच्या भिंती व छतांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे सुरू झाले. त्यानंतर सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांनी घरांमध्ये सुरक्षित आसरा घेतला. मात्र, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेकांच्या घरांचे पत्रे उडून घरातील साहित्याचेही नुकसान झाले. दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरण्याची शक्यता असतानाच वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने भात पिकाच्या दाणे भरणीच्या काळात शेतकरी चिंतेत होते. पिकांना आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा असताना बुधवारी झालेल्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने आणि खांब जमीनदोस्त झाल्याने अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला.
महसूल विभागाने गावपातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. तर महावितरणच्या पथकांकडून कोसळलेले वीज खांब उभे करणे, वाहिन्यांची दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. लवकरच बाधित गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.पिके वाचवण्यासाठी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांचे मात्र या पावसाने मोठे नुकसान केले.
या नैसर्गिक आपत्तीत अजित पाटील, सुरेश बेंडगा, सुनील सासे, अमोल पाटील, संतोष बेंडगा, पिंट्या बेंडगा, पद्माकर पाटील, विठ्ठल भोईर, मधुकर पाटील, मधु खेवरा, सुदाम खेवरा, हेमंत पाटील, दीपक घरत यांच्यासह इतर अनेक ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरांची पत्रे उडून गेल्याने तसेच अन्य प्रकारचे नुकसान झाल्याने संबंधित कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे. नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी तसेच महसूल प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे म्हसरोली परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.