Traditional Grinding Stone | मिक्सरने हिरावला पाथरवटांचा रोजगार; पाटा-वरवंटे विकणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

पारंपरिक पाथरवट कारागिरांवर उपासमारीची वेळ; पाच हजार रुपये गाडीभाडे खर्चून चाळीसगावहून खोडाळ्यात आलेले कुटुंब ग्राहकांच्या प्रतीक्षेत
Pata Varvanta Business
Pata Varvanta BusinessPudhari
Published on: 
Updated on: 

Pata Varvanta Business

दीपक गायकवाड

खोडाळा : एकेकाळी प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात पाटा-वरवंट्याला महत्त्वाचे स्थान होते. चटणी, मसाला किंवा वाटण तयार करण्यासाठी पाट्याचा वापर केला जायचा. पाट्यावर वाटलेल्या पदार्थांची चवच वेगळी असते, असे आजही अनेकजण आवर्जून सांगतात. मात्र, आधुनिक मिक्सर-ग्राइंडरच्या वाढत्या वापरामुळे पाटा-वरवंट्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, पाटा-वरवंटे तयार करून विकणाऱ्या पारंपरिक पाथरवट कारागिरांच्या व्यवसायाला घरघर लागली असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची विदारक झलक खोडाळा येथे पाहायला मिळत आहे.

खानदेशातील चाळीसगाव येथील एक कुटुंब तब्बल पाच हजार रुपये वाहनभाडे खर्च करून पाटा, वरवंटा आणि खलबत्ते विकण्यासाठी खोडाळ्यात दाखल झाले आहे. दिवाळीसारखा मोठा सण आणि गावाकडील घर सोडून लहान मुलांसह त्यांनी हा प्रवास केला आहे. नव्या पाट्या-वरवंट्यांची विक्री होईल, चार पैसे हातात येतील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, या आशेने ते येथे आले. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्यांच्या वस्तूंची विक्री झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

Pata Varvanta Business
Palghar news: दिवाळीच्या दिवशीच संसाराची राखरांगोळी! वाघाडीत आदिवासी कुटुंबाचे घर आगीत जळून खाक

रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार

खोडाळा येथील मुख्य रस्त्यालगत एका बंद दुकानासमोर या कुटुंबाने आपला तात्पुरता संसार थाटला आहे. विक्रीसाठी आणलेले दगडी पाटे आणि वरवंटे एका बाजूला रचून ठेवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाण्याचे कॅन, हंडे, कपड्यांची बोचकी आणि लहान मुलांचे साहित्य असा संपूर्ण संसार उघड्यावर मांडलेला आहे. दिवसभर उन्हात बसून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

पाच हजारांचे गाडीभाडे तरी निघेल का?

दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना या कुटुंबाला मात्र रस्त्याच्या कडेला उघड्यावर दिवस काढावे लागत आहेत. सणासुदीला प्रत्येक घरात फराळ, नवीन कपडे आणि रोषणाईची लगबग सुरू असताना या कुटुंबाची रोजच्या उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू आहे. गाव सोडून येण्यासाठी खर्च केलेले पाच हजार रुपयांचे गाडीभाडे तरी विक्रीतून निघेल का, अशी चिंता त्यांना सतावत आहे. लहान मुलांसह परगावी आल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम मिळेना

पूर्वी पाटा-वरवंटे तयार करणारे पाथरवट कारागीर गावोगावी फिरून चांगला व्यवसाय करायचे. प्रत्येक घरात पाट्याची गरज असल्याने त्यांच्या वस्तूंना कायम मागणी असायची. मात्र, मिक्सर-ग्राइंडरने स्वयंपाकघरातील स्थान मिळवल्यापासून या पारंपरिक व्यवसायाचे चित्र बदलले आहे. ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात पाटा-वरवंट्यांना मागणी असेल, या आशेने हे कारागीर गावोगावी भटकंती करतात. परंतु आता ग्रामीण भागातूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाच्या पोटाला घास मिळणे कठीण झाले आहे.

Pata Varvanta Business
Palghar Accident News: वरई उड्डाणपुलाचा उतार बनतोय मृत्यूचा सापळा! तीन ते चार महिन्यांत दहाहून अधिक अपघात

स्वाभिमान जपत मदतीची अपेक्षा

या कुटुंबाची आस्थेने विचारपूस करून वस्तूंची विक्री किती झाली आणि आतापर्यंत किती उत्पन्न मिळाले, याची माहिती घेतली असता त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव मांडले. ग्रामीण भागातील नागरिकांनीही आमच्याकडे पाठ फिरवली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, आपल्या विपन्नावस्थेची कहाणी नावासह प्रसिद्ध करू नये, अशी विनंती या स्वाभिमानी कुटुंबाने केली. परिस्थिती हलाखीची असली तरी स्वतःचा स्वाभिमान जपण्याची त्यांची भूमिका मनाला चटका लावणारी आहे.

माणुसकीच्या हाताची गरज

दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या गावात आलेल्या या पारंपरिक कारागिरांकडून एखादा पाटा, वरवंटा किंवा खलबत्ता खरेदी केल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकतो. आधुनिक साधनांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या पारंपरिक व्यवसायांना जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एका काळी प्रत्येक स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेल्या पाटा-वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली; पण या बदलाची किंमत आजही पारंपरिक कारागिरांना आपल्या उपजीविकेच्या संघर्षातून मोजावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.