

Khodala Police Station Fire Incident
खोडाळा : खोडाळा येथील पोलीस दुरक्षेत्राच्या (आऊट पोस्ट) इमारतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने पोलीस दुरक्षेत्रात जप्त करून ठेवलेली वाहने तसेच महत्त्वाचे पोलीस दस्तऐवज सुरक्षित राहिले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
खोडाळा पोलीस दुरक्षेत्राची इमारत स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ती कौलारू स्वरूपाची आहे. पावसाळ्यात छतावर मोठ्या प्रमाणात गवत उगवले होते. सध्या दीपावलीचा सण सुरू असल्याने एखाद्या फटाक्याची ठिणगी छतावरील गवतावर पडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगीची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध होण्याची वाट न पाहता पाणी, माती आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आग आटोक्यात आली. परिणामी, दुरक्षेत्रात ठेवलेली जप्त वाहने आणि पोलीस दप्तरातील महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित राहिले.
ब्रिटिशकालीन इमारत आजही जीर्ण अवस्थेत!
या घटनेच्या निमित्ताने खोडाळा पोलीस दुरक्षेत्राच्या इमारतीच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सन १९०२ मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक इमारत आजही जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. मधल्या काळात वेळोवेळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असली, तरी इमारतीची एकूण अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे.
छत, भिंती आणि इमारतीच्या अन्य भागांची झालेली दुरवस्था पाहता येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीत कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याची परिस्थिती आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
सुरक्षा व्यवस्थेचीच सुरक्षा धोक्यात!
पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात; मात्र त्यांच्याच कार्यालयाची इमारत असुरक्षित असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन खोडाळा पोलीस दुरक्षेत्राच्या ऐतिहासिक इमारतीचा सर्वंकष जीर्णोद्धार करावा. तसेच येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुस्थितीतील कार्यालयीन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.