

वाडा : वाडा ते वाशिंद मार्गे ठाणे, मुंबईकडे जाणारा मार्ग सावरोली गावाजवळ तानसा नदीवर असणारा पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अवजड वाहने पुलावरून जाऊ नयेत यासाठी 3 मीटर उंचीच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या, मात्र आता या कमानी गायब झाल्याने रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक अधिकृत करण्यात आली आहे का असा प्रश्न लोकांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असून नव्याने दुरुस्ती केलेल्या रस्त्यासह पुलाचे भविष्य धोक्यात आले आहे.
वाडा ते वाशिंद हा मुंबई, ठाण्याकडे जाण्यासाठी एकमेव सोयीचा मार्ग असून वाडा ते भिवंडी महामार्गाला सध्या पर्यायी मार्ग म्हणून हलक्या वाहनांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. पावसाळ्यापूर्वी सावरोली गावाजवळ तानसा नदीवरील पूल भेगा पडल्याने कमकुवत झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून बंदीचे फलक लावून अवजड वाहने रोखण्यासाठी दोन्ही बाजूने कमानी उभारण्यात आल्या होत्या. बंदी झुगारून काही ट्रक चालक मात्र आपली अवजड वाहने या पुलावरून हाकत असल्याचे पाहायला मिळत असून कमानींचे नुकसान करून सध्या अती अवजड वाहतूकदारांची मुजोरी या मार्गावर पुन्हा सुरू झाली आहे.
स्थानिक रहिवाशांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला असून मुजोर ट्रक चालक कुणालाही जुमानत नाही. वेळ व टोल वाचविण्यासाठी अती अवजड वाहने या मार्गावरून शिरकाव करीत असून रात्री ही वाहतूक अधिक सक्रिय होताना दिसत आहे. रस्त्याच्या कंत्राटदाराने जवळपास तीन वेळा हा मार्ग नव्याने बनवून दिला असून पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांची नुकताच दुरुस्ती करण्यात आली आहे. अती अवजड वाहतुकीवर कुणाचाही अंकुश नसल्याने दुरुस्ती केलाला मार्ग पुन्हा उखडण्याची शक्यता असून सावरोली गावाजवळील पूल धोक्यात सापडला आहे. शहापूर सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस डोळ्यावर पट्ट्या बांधून हा प्रकार नजरेआड घालीत असल्याचा लोकांचा आरोप असून याबाबत प्रशासनाने गंभीर भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात आहे.