Palghar Accident : आश्रमशाळेतील तीन विध्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

गरबा खेळून परतताना एकाच दुचाकीवर पाच जण; दोघे गंभीर
Eklavya Ashram School Accident
Eklavya Ashram School Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील एकलव्य गगनगिरी अनुदानित निवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला, तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सारसून येथे गरबा खेळण्यासाठी गेलेले पाच विद्यार्थी सोमवारी पहाटेच्या सुमारास आश्रमशाळेत परतत असताना त्यांची दुचाकी झाडाला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या विद्यार्थ्याचा नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी दोघांवर नाशिक येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित निवासी आश्रमशाळेत राहणारे पाच विद्यार्थी रविवारी रात्री वसतिगृहातून बाहेर पडून गरबा खेळण्यासाठी सारसून येथे गेले होते. रात्री सुमारे तीनच्या सुमारास गरबा खेळून झाल्यानंतर ते आश्रमशाळेकडे परतत होते. यावेळी एका विद्यार्थ्याने दवाखान्यात जायचे असल्याचे सांगून गावातील दुकानदाराकडून मोटारसायकल मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर एकाच जुन्या स्प्लेंडर मोटारसायकलवर पाचही विद्यार्थी बसून जव्हारच्या दिशेने निघाले.

Eklavya Ashram School Accident
Abhijeet Dipke Police Controversy: दिपकेंनी माफी मागावी नाहीतर हात उपसले जातील... महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक

सारसून गावाच्या पुढे जव्हारकडे येताना एका वळणावर त्यांच्या दुचाकीची ऐनाच्या झाडाला जोरदार धडक बसली. या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात सुमित मोतीराम गिंभल (इयत्ता बारावी), प्रितम गणेश पोटींदा (इयत्ता नववी) आणि रुस्तम अमित पोटिंदा (इयत्ता नववी) या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर सुमित जितेश भोरे (इयत्ता दहावी) आणि सुजित सुनील पोटिंदा (इयत्ता बारावी) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शिक्षण घेऊन भविष्य घडविण्याच्या वयात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Eklavya Ashram School Accident
Ganesh Naik : पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार शेवटपर्यंत राहणार - गणेश नाईक

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.पोलीस निरीक्षक किरण पवार या अपघाताचा तपास करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण, विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या प्रवासाची परिस्थिती आणि आश्रमशाळेतील देखरेखीबाबत काही त्रुटी होत्या का, याचा तपासातून उलगडा होण्याची अपेक्षा आहे.

पालकांची मागणी; चौकशी करून जबाबदारी निश्चित करा

तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी असलेली व्यवस्था पुरेशी होती का, रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाते आणि संबंधित नियमांचे पालन होते का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

आश्रमशाळेतील देखरेखीबाबत प्रश्न

या दुर्घटनेनंतर निवासी आश्रमशाळेतील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या देखरेखीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवासी वसतिगृहात राहणारे पाच विद्यार्थी रात्रीच्या वेळी कोणालाही न सांगता बाहेर कसे पडले? विद्यार्थ्यांनी परवानगीशिवाय आश्रमशाळा सोडली असताना ही बाब संबंधित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही का? रात्री विद्यार्थ्यांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधीक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आमदार हरिश्चंद्र भोये यांची घटनास्थळी भेट

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार हरिश्चंद्र भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. आदिवासी विकास विभागाचे अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दुर्घटनेची वस्तुस्थिती समोर यावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news