

Jamun Market Update
विक्रमगड : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व अवकाळी तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामाचा यंदा पुन्हा एकदा आंबा उत्पादनांबरोबरच काळाभोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झाला आहे. सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे झाडावरची जांभळे खाली पडून वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा जांभूळ पिकावर मोठे संकट आले आहे. यावर्षी उशिराने जांभूळ पिकले असून, विक्री हंगाम उशिराने सुरू झाला आहे. गावरान जांभूळ अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात पिकले नसल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
यामुळे विक्रमगड , वाडा परिसरातील नागरिक जांभळाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यातच गेल्या 10- 12 दिवसापासून अवकाळी पाऊस, तसेच वादळी वार्यामुळे जांभूळ पिकावर मोठा परिणाम झाला आहे, तर तयार झालेली जांभळे गळून गेली आहेत. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात जांभळे बाजारात दाखल झाली नाहीत.
गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते, मात्र जांभळाचे उत्पादन कमी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालला आहे. त्यात पावसामुळे जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबत जात जून उजाडतो आणि फळे खराब होतात. शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागते. गेल्या दोन-चार वर्षांपासून पाहिजे, तसे उत्पन्न निघत नसल्याने शेतीप्रमाणे सर्वच आलबेल झाले आहे. आंब्याप्रमाणे जांभळालाही उशिराने मोहोर आल्याने हंगाम उशिराने सुरू झाला. परिणामी जांभळाचे उत्पादन, त्यातून मिळणारा पैसा शेतकर्यांना कमी मिळणार आहे.
उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने गावरान जांभळे दुर्मिळ होत आहेत. गेल्या दोन-चार वर्षांपासून जांभळाची जुनी झाडेही कमी झाली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. तसेच पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही. त्यामुळे गावरान जांभळाचा पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झाले आहे.