Vasai Virar Anganwadi : वसई-विरारमध्ये अंगणवाड्यांत आवश्यक सुविधांचा प्रश्न गंभीर

चिमुकल्यांच्या पोषण व शिक्षणावर परिणाम होण्याची भीती
Vasai Virar Anganwadi
वसई-विरारमध्ये अंगणवाड्यांत आवश्यक सुविधांचा प्रश्न गंभीरpudhari photo
Published on
Updated on

विरार : वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना बालकांच्या आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पाया मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेवांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. महिला व बालविकास विभागामार्फत शहरातील विविध भागांत अंगणवाड्या कार्यरत असल्या तरी अनेक ठिकाणी स्वतंत्र इमारतींचा अभाव, अपुरी जागा, इमारतींची दुरवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खेळणी व शैक्षणिक साहित्याची अपुरी उपलब्धता याबाबत वेळोवेळी नागरिकांकडून तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली महत्त्वाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज प्रकर्षाने व्यक्त होत आहे.

अंगणवाडी ही केवळ बालसंगोपनाची जागा नसून तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आहार, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरणासाठी मार्गदर्शन तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषणविषयक सल्ला देणारे महत्त्वाचे केंद्र आहे.

Vasai Virar Anganwadi
India Mental Health Crisis: नैराश्याच्या विळख्यातील भारत

बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या केंद्रांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे.वसई-विरारमध्ये नवीन गृहसंकुले उभी राहत असून लोकसंख्याही सातत्याने वाढत आहे. मात्र त्याच प्रमाणात अंगणवाड्यांची सुविधा वाढली आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Vasai Virar Anganwadi
ZP Schools admission: राज्‍याच्‍या सात जिल्‍ह्यांमध्‍ये मराठी शाळांना पालकांचा अग्रक्रम

काही भागांत अंगणवाड्या भाड्याच्या जागांमध्ये चालत असल्याने जागेची मर्यादा जाणवते. अनेक ठिकाणी चिमुकल्यांना खेळण्यासाठी मोकळी जागा नसल्याने त्यांच्या विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिरसाड अंगणवाडीची धोकादायक अवस्था

खानिवडे : वसई पूर्वेतील शिरसाड गावातील अंगणवाडीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक बनली असून, गळक्या छताखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. छतावरील सिमेंटच्या पत्र्यांना तडे गेल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात गळत असून, संपूर्ण अंगणवाडीत पाणी साचत आहे. त्यामुळे बालकांना ओलसर व असुरक्षित वातावरणात बसून शिक्षण घ्यावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या छतावरील अनेक पत्रे तुटलेली असून काही ठिकाणी ती सैल झाली आहेत.

मुसळधार पाऊस किंवा जोरदार वाऱ्यामुळे ही पत्रे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लहान मुलांच्या जीविताशी संबंधित या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शिरसाडमधील अंगणवाडीसह परिसरातील काही अन्य अंगणवाड्यांमध्येही गळक्या छताची समस्या असल्याचे समोर आले आहे. अंगणवाडी ही बालकांच्या शिक्षण, पोषण व आरोग्याची पहिली पायरी मानली जाते. मात्र याप्रकाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बालकांच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात योग्य पोषण, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळाले, तर भविष्यातील शारीरिक व बौद्धिक विकास अधिक सक्षम होतो. त्यामुळे प्रत्येक अंगणवाडीत आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.

डॉ. अमोल पाटील, बालरोगतज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news