

Palghar Rain News
पालघर : पालघर जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, मोखाडा, जव्हार, वाडा, तालुक्यात जोरदार वाऱ्यासह व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने तसा अंदाज दिला होता. अचानक पडलेल्या पावासामुळे ग्रामीण भागात नागरिकांची धावपळ उडाली.
डहाणू, पालघर,विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा तालुक्यात साडे सात ते आठ वाजताच्या दरम्यान वादळी वारे व विजेचा कडकडाट सुरु झाला. शहरी व ग्रामीण भागात यादरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात जोरदार पावासाला सुरुवात झाली.वसई तालुक्यात सोसाट्याचा वारा व पावसाच्या तुरळक सरी होत्या.
अचानक आलेल्या पावसाने विटभट्टी मालक, शेतकरी भांबावून गेले. काही ठिकाणी पावसामुळे भाजीपाला शेतीवर संकट ओढवणार आहे. त्यामुळे नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात आंबा पिकांचेही नुकसानी झाल्याची दाट शक्यता आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी घरकुलांचे बांधकाम सुरु असून उघड्यावर राहत असलेल्या कुटुंबाचे खूप हाल झाले. पालघर तालुक्यात काही ठिकाणी लग्नकार्य होते.
मात्र वादळी वाऱ्यामुळे मंडप उडाल्याचे व नुकसान झाल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले. तर काहींचे पत्रे फूटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पालघर परिसरामध्ये सव्वानऊ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.