

पालघर : हनिफ शेख
खरंतर सध्या आपल्या देशाची वाटचाल आत्मनिर्भरतीकडे चाललेली असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज नवीन जिल्हा होऊन बारा वर्षे होत आली तरी देखील पालघर जिल्हा हा आरोग्याच्या बाबतीत कधी आत्मनिर्भर होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. पालघरमध्ये सध्या पालघर जिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर यांचे काम सुरू आहे. यामधील पालघर जिल्हा मुख्यालयापासून 15 किमी दूर असलेल्या मनोर या ठिकाणी जो संपूर्ण जिल्ह्याला मध्यवर्ती ठरू शकतो अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरचे काम सुरू आहे.
हे काम 2016 ला मंजूर झाले होते. त्यावेळी या कामाची एकूण रक्कम 74 कोटी होती यानंतर 2024 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता काढून या कामाची एकूण रक्कम 120 कोटी दोन लाख एवढी करण्यात आली. आज घडीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून संकीर्ण स्थापत्य कामे विद्युत विषयक काम व इतर अनुषंगिक कामे प्रगतीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या कामासाठी अजून अवधी लागणार आहे यामुळे 2016 ते सध्या सुरू असलेले 2026 आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा प्रकल्प जर 10 वर्ष झाल्यानंतरही पूर्ण होणार नसेल तर प्रत्येक क्षण सर्व सुख सोयी युक्त आरोग्य यंत्रणा आणि त्यासाठी आवश्यक तज्ञ वैद्यकीय अधिकारी कधी भरण्यात येतील हा संशोधनाचा विषय आहे.
या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन १ मे रोजी करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या तसे अनेकदा पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी जाहीरपणे सांगितले देखील होते. मात्र यानंतर थेट राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन होण्याची घोषणा अधिवेशनात केली होती मात्र तरी देखील आजवर या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन झाले नसल्याने याला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल आता पालघरवासीय करीत आहेत.
जिल्ह्यातील आजची आरोग्याची परिस्थिती पाहता नुसत्या आरोग्य इमारती नकोत तर त्यामध्ये सर्व आजारावर उपचार करू शकणाऱ्या आवश्यक यंत्रणा आणि आरोग्य अधिकारी देखील असावेत अशी अपेक्षा जिल्हा वाशियाकडून व्यक्त होत आहे. अन्यथा केवळ इमारतींचे उद्घाटन करून पुन्हा तिथून रुग्ण जर स्थलांतरच करायचे असतील तर मग येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची राहणार आहे हे नक्की. ट्रॉमा केअर सेंटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.
हे काम पूर्ण झाले असून थोड्याफार प्रमाणात किरकोळ काम बाकी आहेत तीही काही दिवसात पूर्णत्वास जातील मात्र रुग्णालयासाठी आवश्यक असणारे वर्ग ३/४ तसेच मेडिकल ऑफिसर काही पदे भरण्यात आली आहे काही पदे भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.मात्र अजून पर्यंत त्या बाबत ठोस निर्णय झाला नसल्याने हे रुग्णालय चालू करून आलेल्या रुग्णांची तपासणी कोण करणार हा मोठा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला आहे. मात्र त्यानंतर काही पदे भरल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी याचे उद्घाटन होईल असा आरोग्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलं होतं मात्र तेव्हा देखील या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन झाले नाही.
अशीच काहीशी परिस्थिती पालघर जिल्हा रुग्णालयाची देखील आहे 200 खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी 209 कोटींचा खर्च केला आहे मात्र अद्याप पर्यंत त्या रुग्णालयाचे काम देखील सुरू आहे. यामुळे स्वतंत्र जिल्हा होऊन बारा वर्षे झाल्यानंतर देखील पालघर जिल्हा रुग्णालय असेल की ट्रॉमा केअर सेंटर असेल यामधील जिल्हास्तरावर जिल्ह्यातच उपचार करणारी आरोग्य व्यवस्था अद्याप पर्यंत निर्माण न झाल्याने आजही येथील आदिवासी बांधवांना वापी नाशिक मुंबई अशा ठिकाणांचा आधार घ्यावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत पालघर जिल्हा शिल्लकित्सक डॉक्टर रामदास मराड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ट्रॉमा केअर सेंटरची काही काम शिल्लक राहिली आहेत आणि अद्याप पर्यंत ती इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेली नसल्याचे सांगितले मात्र दीपावलीच्या अगोदर या संदर्भातल्या प्रक्रिया पूर्ण होऊन उद्घाटन होऊ शकेल अशी अपेक्षा दैनिक पुढारीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
पदभरती केली मात्र तीही अर्धवटच...
पालघर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर असल्याचे एकूणच चित्र बदलण्यासाठी शासनाकडून पाऊले उचलण्यात आली असून 10 जुलै रोजी एका शासकीय आदेशाद्वारे राज्यभरातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा सर्व रुग्णालयांसाठी जवळपास 185 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये पालघर जिल्हा रुग्णालयासाठी झुकते माप देण्यात आलेले असून बालरोग तज्ञ स्त्रीरोगतज्ञ भूलतज्ञ जनरल फिजिशियन क्ष किरण विभाग अशा विविध जवळपास 15 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे. तर मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर साठी 6 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे.