

पालघर : नविद शेख
खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने भात पिके वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने धरणातील पाणीसाठ्याचे पिण्याच्या वापरासाठी नियोजन करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी केल्याने वांद्री धरणातील पाणी सिंचनासाठी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.
"धरण उशाशी असूनही शेतजमिनी तहानलेल्या राहणार असतील, तर धरणाचा उपयोग काय?" असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. "हाच दिवस पाहण्यासाठी धरण उभारणीसाठी जमिनी दिल्या होत्या का?" असा उद्विग्न प्रश्नही धरणग्रस्त आणि शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पालघर तालुक्यातील गांजे गावाच्या हद्दीतील वांद्री धरणाची एकूण साठवण क्षमता ३५ दशलक्ष घनमीटर असून, धरणातून मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. मात्र यंदा पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने भात पीक दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात आले असताना पाण्याअभावी पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वांद्री धरणातील पाणी सिंचनासाठी राखीव असले तरी शासनाच्या निर्देशानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. धरणातील १३ एमएलडी पाणी साठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नंदाडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २ एमएलडी, तर रिलायन्सच्या टोकराळे येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ११ एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र संबंधित जलवाहिन्या टाकण्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने प्रत्यक्ष पाणी उचल सुरू झालेली नाही. सहा महिन्यांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरक्षित साठा वगळता धरणातील उपलब्ध पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षी वांद्री धरणातील जॅकवेलच्या दुरुस्तीच्या कामासाठी धरण रिकामे करण्यात आले होते. पाणी वांद्री नदीमार्गे वैतरणा खाडीत सोडण्यात आले होते. सिंचन क्षेत्रात निम्म्याने घट झाली असली तरी भातशेतीसाठीपाणी सोडल्यानंतरही धरणात पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, कालव्यांमधील पाणीगळती रोखण्यासाठी कालव्यावर १०४ दुरुस्तीची कामे करण्यात आली असून त्यासाठी ३ कोटी १८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच धरणाच्या जॅकवेलमधील कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र एवढ्या खर्चानंतरही ऐन पिकांच्या संकटाच्या काळात पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार नसेल, तर सिंचन प्रकल्पाचा मूळ उद्देश काय, असा सवाल शेतकरी करत आहेत.
कालव्यांद्वारे सिंचनाचे पाणी
वांद्री धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी ९ किलोमीटर असून वेहलोली, खैरे, सातिवली, कुडे, बोट आणि हालोली परिसरातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. तर उजव्या कालव्याची लांबी १२ किलोमीटर असून गांजे, ढेकाळे, वरई, गुंदावे, दहिसर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव आणि सोनावे या गावांतील शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो.
वांद्री धरण : पाणी साठा आणि आरक्षण
धरणाची एकूण साठवण क्षमता : ३५ दशलक्ष घनमीटर
सिंचन क्षेत्र : २०४४ हेक्टर
पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी राखीव साठा :
नंदाडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना – २ एमएलडी
रिलायन्स पेट्रोकेमिकल प्रकल्प, टोकराळे – ११ एमएलडी
एकूण राखीव साठा – १३ एमएलडी
सिंचनासाठी उपलब्ध राहणारा अंदाजे साठा : २२ एमएलडी
अतिवृष्टीत पाण्याच्या प्रवाहामुळे वांद्री धरणाच्या दोन्ही कालव्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुरुस्ती साठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. भात शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु कालवे नादुरुस्त आहेत तसेच धरणाच्या पाण्याचे पिण्याच्या वापरासाठी नियोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सांडव्यातून ओव्हरफ्लो होणारे पाणी सिंचनासाठी सोडण्यासाठी शक्यता तपासली जात आहे.
सचिन पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, पालघर.