Palghar flood rescue : पुराच्या पाण्यातून ‘जीवनवाहिनी’चा प्रवास

गरोदर मातेला वेळेत रुग्णालयात पोहोचवत दिला नवजीवनाचा आनंद
Palghar flood rescue
Palghar flood rescuepudhari photo
Published on
Updated on

पालघर :मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने रस्ते बंद झाले, गावाचा संपर्क तुटला; मात्र अशा बिकट परिस्थितीतही धैर्य, तत्परता आणि मानवी संवेदनशीलतेच्या जोरावर एका गरोदर मातेपर्यंत ‘जीवनवाहिनी’ पोहोचली. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत रुग्णवाहिकेने केलेल्या थरारक प्रवासानंतर पालघर तालुक्यातील नगावे येथील गरोदर अनुश्री डगला यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई व बाळ दोघीही सुखरूप असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वरई–पारगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे गिराळे–नगावे ग्रामपंचायत हद्दीतील नगावे गावाचा संपर्क तुटला होता. याच दरम्यान नगावे गावातील गरोदर अनुश्री डगला यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. रुग्णालयात नेण्यासाठी गावातील आशा सेविकेने तातडीने मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागवली. मात्र पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद असल्याने रुग्णवाहिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. असे असतानाही रुग्णवाहिका चालक योगेश पाटील यांनी धाडस दाखवत मासवण येथून नगावे गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचवली.

Palghar flood rescue
Palghar Heavy Rain: मुसळधार पावसाचा डहाणू तालुक्याला जबर फटका

गरोदर महिलेला घेऊन रुग्णवहिकेने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर रस्त्यावरील पाण्याची पातळी आणखी वाढली होती. जीव धोक्यात घालून रुग्णवाहिकेने तीन ठिकाणचे पाण्याचे अडथळे पार केले.साखरे गावाच्या नाक्यापर्यंत पोहोचल्यानंतर साखरे आणि दहिसर दरम्यान पाण्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे समोर आले.यानंतर मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामार्गावर जाण्यासाठी असलेल्या चिखलयुक्त आणि निसरड्या रस्त्यावरून रुग्णवाहिका सुरक्षितपणे महामार्गावर आणण्यात आली. मासवण क्रॉसिंगवरून खाली उतरून मनोर–पालघर मार्गे रुग्णवाहिका चहाडे नाका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली. आरोग्य केंद्रात दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनुश्री डगला यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.

अखेर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची सुरक्षित प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि नवजात बालिका दोघीही ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.साखरे आणि नावाझे गावातील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला.

Palghar flood rescue
Palghar heavy rain : वसईला ४१ शिक्षकांची पुरातून सुटका

समन्वयामुळे शक्य

पुराच्या संकटात अडकलेल्या एका मातेचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांची तत्परता, रुग्णवाहिका चालक व कर्मचाऱ्यांचे धाडस आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे एका नव्या जीवाचे आगमन सुखरूप झाले. या घटनेतून आपत्तीच्या काळात माणुसकी आणि समन्वयाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news