Khed Jagbudi River Drowning | मुंबईहून काकाकडे सुट्टीसाठी आलेल्या तीन भावंडांचा जगबुडी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

महाड नाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहताना दुर्घटना
Jagbudi River Drowning Incident
Jagbudi River Drowning IncidentPudhari
Published on
Updated on

Jagbudi River Drowning Incident

खेड : आनंदाचे क्षण काही क्षणांतच दुःखाच्या महासागरात बदलू शकतात, याची प्रचिती खेड शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रात बुधवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेतून आली. मुंबईहून नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेल्या तीन तरुण भावंडांचा नदीत बुडून मृत्यू झाला. एका क्षणात तिघांचे आयुष्य संपले आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

आकाश रामा कांबळे (वय २३), नरेश रामा कांबळे (वय २२) आणि कैलास रामा कांबळे (वय १७) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे चेंबूर येथील मुकुंदनगर परिसरातील रहिवासी असून खेड शहरातील एकविरानगर येथे राहणारे त्यांचे काका अनिल दगडू कांबळे आणि काकू पूजा कांबळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. सुट्टीतील आनंदाचे काही दिवस नातेवाईकांसोबत घालवण्यासाठी आलेल्या या तरुणांना मृत्यू इतक्या जवळ दबा धरून बसला आहे, याची कल्पनाही नव्हती.

Jagbudi River Drowning Incident
Khed Dumper Accident | रिव्हर्स घेताना डंपर दरीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

बुधवारी (दि.१०) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आकाश, नरेश, कैलास आणि त्यांच्यासोबत असलेले गोपाळ राया कांबळे हे महाड नाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. नदीकिनारी हशा, गप्पा आणि पोहण्याचा आनंद सुरू होता. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच परिस्थिती भीषण बनली.

दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास तिघांपैकी एक जण खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. आपल्या साथीदाराला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यासाठी उरलेले दोघेही त्याच्या मदतीला धावले. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका जीवाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिन्ही तरुण खोल पाण्यात अडकले आणि काही क्षणांतच जगबुडीच्या पाण्याने त्यांना कायमचे कवेत घेतले. यावेळी त्यांच्यासोबत गेलेले त्यांचे काका अनिल कांबळे व मोठे बंधू गोपाळ कांबळे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.

Jagbudi River Drowning Incident
Khed Ratnagiri Water Crisis | खेड तालुक्यात 13 गावांतील 28 वाड्यांत भीषण पाणीटंचाई

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसह बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला चिरणारा होता.

शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आले. दरम्यान, ही दुःखद बातमी चेंबूर येथील त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. एकाच घरातील तीन तरुण मुलांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कालपर्यंत घरात आनंदाने वावरणारी तीन लेकरे आज कायमची निघून गेली. त्यांच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षणच आता कुटुंबीयांच्या हाती उरले आहेत. जगबुडी नदीपात्रातील ही दुर्दैवी घटना खेड शहरासह संपूर्ण जिल्ह्याला हेलावून टाकणारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news