

Gundale Plastic Godown Fire Illegal Gutkha Factory
बोईसर : गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टी परिसरात आज (दि.३१) एका प्लास्टिक गोडाऊनला लागलेल्या आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ही आग केवळ अपघाती नसून, बेकायदेशीर गुटखा निर्मितीच्या धंद्याचा पर्दाफाश करणारी ठरली आहे. या गोडाऊनमध्ये 'दिवाना आशिक' नावाचा सुगंधित गुटखा तयार केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
आगीमुळे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. तर मोठ्या प्रमाणावर गुटख्याच्या पुड्या, कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री सापडली. विशेष म्हणजे, गोडाऊनजवळील एका गाळ्यात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा आगीच्या पाण्यामुळे बाहेर आला आणि बेकायदेशीर धंद्याचा भांडाफोड झाला.
हा गोरखधंदा थेट बोईसर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू होता. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला गुटखा व्यवसाय पोलिसांच्या नजरेपासून कसा सुटला, हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? गुटखा निर्मितीसाठी लागणारे साहित्य कुठून आणले जात होते? याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तर या गोडाऊनवर व गुटखा निर्मितीत सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.