

Gundale Plastic Godown Fire
बोईसर: बोईसर-चिल्हार रस्त्यावर गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील दोन बंगला परिसरात एका प्लास्टिक गोडाऊनला आज (दि.३१) भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर आणि आगीच्या झळा निर्माण झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी घटनास्थळी कोणतीही अग्निरोधक यंत्रणा, आपत्कालीन रचना दिसून आली नाही, ही बाब धक्कादायक ठरली.
गेल्या महिन्यातच वाघोबा खिंड वारंगडे परिसरात १४ गोडाऊन भस्मसात झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गोडाऊन आगीची दुर्घटना घडली आहे. प्लास्टिक, रबरसारख्या ज्वलनशील वस्तूंची मोठ्या प्रमाणावर साठवणूक दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये करताना स्थानिक प्रशासन आणि गोडाऊन मालक दोघांच्याही दुर्लक्षाची किंमत सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या गोडाऊनमध्ये ना आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर इक्विपमेंट होती, ना कर्मचारी. यावरून गोडाऊन मालक व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले आहे. गुंदले ग्रामपंचायत परिसरात अनेक गोडाऊन थेट झोपडपट्टी किंवा रहिवासी वसाहतींना लागून उभारले गेले आहेत. यामुळे कधीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने, यामागे प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्ष वृत्ती दिसून येते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सर्व गोडाऊनची सुरक्षा तपासणी करून अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.