

Maharashtra Government Schemes
खानिवडे : शासनाकडून शेतकऱ्यांना शेती उत्पादनाला साहाय्यभूत असलेले शेती साहित्य व शेती अवजारांसाठी शासनाचे अनुदान सुरूच असून शेतकऱ्यांनी यासाठी शेती संबंधित कृषी विभाग, पंचायत समिती यांच्याकडे रीतसर मागणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेती साहित्य मिळत नसल्याचा आरोप होत असताना शेतकी विभागाशी साधलेल्या संपर्कात असे सांगण्यात आले की, पूर्वी पंचायत समितीच्या शेती विभागात शेती साहित्य मिळत असे. शेतकरी आपला सातबारा व इतर कागदपत्रे सादर करून शेती साहित्य घेऊन जात होते. आताही शेतकऱ्यांना शेती साहित्य मिळत आहे मात्र ते अनुदानाच्या स्वरूपात मिळते.
यामध्ये केलेल्या साहित्य, अवजारे, यंत्र मागणीसाठी अर्जासह सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.
यासाठी शेतकऱ्यांना स्वतःला त्यांच्या आवडीचे, त्यांना अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचे शेती साहित्य बाजारातून खरेदी करावे लागते. जेव्हा शासनामार्फत थेट शेती साहित्य वितरित केले जात होते तेव्हा अनेक शेतकऱ्यां कडून शेती साहित्य व त्याच्या दर्जाबाबत आक्षेप घेण्यात येत होता. त्यानंतर सन २०१६ नंतर थेट साहित्य वितरित करण्या ऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व शासनाने ठरवून दिलेल्या रकमे प्रमाणे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस योजना (डीबीटी अंतर्गत) वैयक्तिक लाभाच्या योजनेतून बॅटरी पंप, स्प्रे पंप, एचटीपी स्प्रे पंप इत्यादींना ५०% अनुदान देय आहे. याउपर शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व सुधारित कृषि प्रक्रीया उदद्योगांकरीता करण्यात येणाऱ्या हस्तंचलीत व स्वयंचलीत सुधारित कृषि अवजारांवर उदा. मळणीयंत्र. ताडपत्री, गवतकापणी यंत्र, पॉवर विडर, चापकटर, काजु प्रक्रिया यंत्र, दातेरी विळे, नारळ झावळ्या कापणी यंत्र, भात लावणी यंत्र, भात कापणी यंत्र, पाईप, शेड नेट, मल्चिंग पेपर तसेच इतर मान्यताप्राप्त शेती उपयोगी सुधारित अवजारे व यंत्र सामुग्री, पॉवर टिलर, पॉवर विडर, मिनी राईस मिल, मिनी डाळ मिलयांचेसाठी सुद्दा ५०% अनुदान देण्यात येते. याच प्रमाणे शेतीसाठी सिंचन साहित्य म्हणून डिझेल /पेट्रोडिझेल, विद्युत मोटर पंप इ. जल उपसा सिंचन साधने तसेच ठिबक सिंचन संच या साठीही ५०% अनुदान देण्यात येते.
आधारकार्ड, ७/१२ व ८ अ उतारा (डिजिटल किंवा तलाठी यांचे स्वाक्षरी असलेला), राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक (आधारकार्ड संलग्न) यासह तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागाशी संपर्क साधुन विहित नमुन्यातील मागणी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत. यामध्ये ठरवलेल्या लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास पंचायत समिती स्तरावर लॉटरी काढुन निवड केली जाते.