

कासा ः निलेश कासट
देशाससह जगभरात पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि वाढत्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन नुकताच साजरा करण्यात आला. मात्र निसर्गसंपन्न पालघर जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, डोंगर पोखरणे आणि पर्यावरणाची हानी होत असल्याने वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालघर जिल्हा पश्चिम घाटाच्या रांगांनी, घनदाट वनसंपदेने आणि समृद्ध वन्यजीवांनी नटलेला आहे. तरीही ‘चौथी मुंबई’ उभारण्याच्या प्रशासनाच्या धोरणामुळे वाढवणसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळत आहे. या प्रकल्पांसाठी सपाटीकरण आणि भरावाच्या कामांमुळे डोंगरटेकड्या पोखरल्या जात असून सुरुंग स्फोटांसह मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. वाढवण बंदराला जोडणाऱ्या हरित मार्गासाठी डहाणू आणि पालघर तालुक्यातील तब्बल 72 हजार 760 झाडांची तोड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बदल्यात धुळे जिल्ह्यात सुमारे 4.75 हेक्टर क्षेत्रावर पर्यायी वनीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लागवड जिल्ह्याबाहेर होत असल्याने स्थानिक पर्यावरणाच्या भरपाईचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.याचबरोबर डहाणू-जव्हार-मोखाडा राज्य महामार्ग क्र. 30 चे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. डहाणू शहरातील चंद्रसागर (अपना बाजार) ते चारोटीपर्यंत 25 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार असून या कामासाठी 1 हजार 760 झाडांची तोड होणार आहे. त्यामध्ये नगर परिषद क्षेत्रातील 876 झाडांचा समावेश असून वड, जांभूळ यांसारख्या वृक्षांची तोड सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण समितीमार्फत नवा साखरा येथे 1 हेक्टर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने 30 हजार रोपे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातच वृक्षारोपण करण्याची स्थानिकांची मागणी असली, तरी जागेअभावी अडचणी येत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सांगण्यात आले आहे. मात्र जमीन उपलब्ध करून दिल्यास तत्काळ लागवड करण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकल्पांच्या भरावासाठी डोंगर पोखरले जात असतानाच जिल्ह्यातील समुद्र व खाडी परिसरातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक सुरू असल्याचेही आरोप होत आहेत. पर्यटनाच्या नावाखाली जंगल, धरणे आणि धबधब्यांच्या परिसरात वाढते प्रदूषण पाहायला मिळत असून प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. पर्यावरणाची हानी होत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील विद्यार्थी एकाच दिवशी 2 कोटी सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमासाठी एकवटत आहेत. तसेच पर्यावरणप्रेमी संघटना आणि नागरिक सार्वजनिक ठिकाणे तसेच गडकिल्ल्यांवरील प्लास्टिक कचरा गोळा करून संवर्धनासाठी झटत आहेत.