

मानवाच्या सभोवतालच्या निसर्गात अनेक प्रकारचे पक्षी आढळतात; परंतु काही पक्षी असे असतात की, ते आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतात. घराच्या कडेला, छपराखाली, खिडकीच्या चौकटीत किंवा झाडाच्या फांदीवर छोटंसं घरटं बांधून किलबिलाट करणारी चिमणी हा असा पक्षी आहे की, ज्याच्याशिवाय भारतीय शहरांचे आणि गावांचे चित्र काही दशकांपूर्वीपर्यंत अपूर्ण वाटत असे. सकाळी घराबाहेर पडताना चिमण्यांचा आवाज ऐकू येणे, ही एक साधी पण आनंददायी गोष्ट होती. बालपणातील अनेक आठवणींमध्ये चिमण्या सामावलेल्या असतात. ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे बालगीत असो किंवा घराच्या अंगणात धान्य टिपणाऱ्या चिमण्या या छोट्या पक्ष्याने भारतीय संस्कृतीत एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
मात्र, गेल्या दोन-तीन दशकांत परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये चिमण्या कमी झाल्याचे लोकांच्या लक्षात येऊ लागले. काही ठिकाणी तर चिमणी पाहणे ही दुर्मीळ घटना ठरू लागली. एकेकाळी घराच्या कडेला सहज घरटे बांधणारा हा पक्षी अचानक का कमी झाला, हा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही पडू लागला. याच चिंतेतून जगभरात चिमण्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व लोकांना समजावून सांगणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी समाजाला प्रेरित करणे.
चिमणी हा आकाराने लहान असला, तरी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे. जगभरात चिमण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात; परंतु मानवाच्या वस्तीजवळ राहणारी सर्वात परिचित प्रजाती म्हणजे घरचिमणी. इंग्रजीत तिला ‘हाऊस स्पॅरो’ असे म्हणतात आणि तिचे वैज्ञानिक नाव झरीीशी वेाशीींळर्लीी असे आहे. हा पक्षी माणसांच्या सहवासात राहण्यास अत्यंत कुशल आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून चिमण्या मानवाच्या वस्तीभोवती राहतात. धान्य, बिया, लहान कीटक आणि उरलेले अन्न हे तिच्या आहाराचा भाग असतात. शहरांमध्ये, गावांमध्ये आणि शेतीच्या परिसरात ती सहज जुळवून घेते.
पूर्वीच्या घरांची रचना चिमण्यांसाठी अनुकूल होती. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, लाकडी बीम, छपराच्या कडांमधील फटी, वाड्यांच्या अंगणातील झाडे या सर्व गोष्टी चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा देत असत. घराच्या ओसरीत ठेवलेले धान्य, गिरण्या, बाजारपेठा, धान्याची दुकाने यामुळे चिमण्यांना अन्नाची कमतरता भासत नसे. त्यामुळे शहरांमध्येही चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती; परंतु शहरीकरणामुळे या परिस्थितीत मोठा बदल झाला. काँक्रीटच्या उंच इमारती, काचांच्या बंद खिडक्या, पूर्णपणे सीलबंद बांधकाम आणि स्वच्छतेच्या बदललेल्या पद्धती यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी आवश्यक जागाच उरलेली नाही.
चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे, अन्नसाखळीतील बदल. चिमण्यांची पिल्ले जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रथिनयुक्त अन्नावर अवलंबून असतात. त्यावेळी आई-वडील त्यांना लहान कीटक खाऊ घालतात. शहरांमध्ये कीटकांची संख्या कमी होत गेल्यामुळे पिलांना पुरेसे अन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये आणि बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे कीटकांची संख्या घटली आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम चिमण्यांवर झाला आहे.
याशिवाय शहरी जीवनशैलीत झालेल्या बदलांचाही चिमण्यांवर परिणाम झाला आहे. पूर्वी बाजारपेठांमध्ये धान्य सैल स्वरूपात विकले जात असे. त्यातील काही धान्य जमिनीवर सांडत असे आणि चिमण्यांना सहज अन्न मिळत असे. आज बहुतेक अन्नपदार्थ पॅकबंद स्वरूपात विकले जातात. त्यामुळे चिमण्यांना मिळणारे अन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. शहरांमध्ये वाढलेले प्रदूषण, वाहतुकीचा आवाज, हिरवळींची घट आणि झाडांची कमी संख्या यामुळेही पक्ष्यांना अनुकूल वातावरण मिळत नाही.
चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत सर्वाधिक चर्चेत आलेले कारण म्हणजे मोबाईल टॉवर्स. मोबाईल फोनच्या वापरात वाढ झाल्यानंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर्स उभारले गेले. या टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय किरणोत्सर्जनामुळे पक्ष्यांवर परिणाम होतो का, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी असा दावा करण्यात आला की, या किरणोत्सर्जनामुळे चिमण्यांच्या अंड्यांवर परिणाम होतो किंवा त्यांच्या दिशादर्शन क्षमतेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक लोकांनी चिमण्यांच्या घटण्यामागे मोबाईल टॉवर्सना जबाबदार धरले. मानवासाठी उपयुक्त असलेल्या टॉवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरल्या त्या चिमण्या.
परंतु, या विषयावर केलेल्या वैज्ञानिक संशोधनातून अधिक गुंतागुंतीचे चित्र समोर आले आहे. काही प्रयोगांमध्ये उच्च प्रमाणातील किरणोत्सर्जनाचा जैविक परिणाम दिसून आला असला, तरी शहरांमधील चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. अनेक संशोधनांनुसार चिमण्यांच्या घटण्यामागे शहरीकरण, अनन्साखळीतील बदल, कीटकांची कमतरता आणि घरट्यांसाठी जागेचा अभाव ही कारणे अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळे मोबाईल टॉवर हा मुद्दा पूर्णपणे नाकारता येत नसला, तरी तो एकमेव कारण मानणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य ठरत नाही; पण रेडिएशनमुळे चिमण्यांचे घरटे बनविणे, प्रजनन आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
पर्यावरणीय दृष्ट्या पाहिले, तर चिमण्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या लहान कीटकांवर उपजीविका करतात आणि त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने कीटक नियंत्रणात मदत करतात. शेती क्षेत्रात अनेक प्रकारचे कीटक पिकांचे नुकसान करतात. चिमण्या आणि इतर पक्षी हे कीटक खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे शेतीचे अप्रत्यक्ष संरक्षण होते. काही वेळा चिमण्या बिया आणि धान्य खाल्ल्यानंतर त्या इतर ठिकाणी पसरवतात.
चिमण्या हे पर्यावरणातील बदलांचे सूचक मानले जातात. एखाद्या परिसरात चिमण्यांची संख्या कमी होत असेल, तर त्या परिसंस्थेत काहीतरी बदल घडत असल्याचे संकेत मिळतात. वैज्ञानिक भाषेत अशा प्रजातींना ‘इंडिकेटर स्पेशीज’ असे म्हटले जाते. म्हणजेच त्या प्रजातींच्या उपस्थितीवरून त्या परिसराच्या पर्यावरणीय आरोग्याचा अंदाज घेता येतो. चिमण्या नाहीशा होत असतील, तर त्या परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होत असल्याची शक्यता असते.
गेल्या काही वर्षांत चिमण्यांच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. भारतात काही स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण अभ्यासकांनी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग केला आहे. घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा झाडांवर लावता येतील अशी लाकडी किंवा मातीची घरटी तयार करून ती नागरिकांना देण्यात येतात. अनेक ठिकाणी लोकांनी घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमण्यांसाठी पाण्याची भांडी आणि धान्य ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशा छोट्या उपक्रमांमुळे काही भागांमध्ये चिमण्या पुन्हा दिसू लागल्या आहेत.
शहर नियोजनाच्या दृष्टीनेही या विषयाचा विचार करणे आवश्यक आहे. आधुनिक इमारती बांधताना जैवविविधतेचा विचार केला जात नाही. इमारतींच्या रचनेत लहान फटी, कोनाडे किंवा पक्ष्यांसाठी घरटी बसवण्याची व्यवस्था केली, तर चिमण्यांना पुन्हा शहरांमध्ये राहण्याची संधी मिळू शकते. काही देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शहरांमध्ये झाडांची संख्या वाढवणे, लहान उद्याने आणि हिरवळी जपणे, कीटकनाशकांचा वापर कमी करणे यासारख्या उपायांमुळे पक्ष्यांना अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.
चिमण्यांचे संरक्षण ही केवळ सरकार किंवा पर्यावरण संस्थांची जबाबदारी नाही. सामान्य नागरिकही या कामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पाण्याची छोटी वाटी ठेवणे, थोडे धान्य ठेवणे, झाडे लावणे आणि कृत्रिम घरटी बसवणे यासारख्या साध्या उपायांमुळे चिमण्यांना मदत होऊ शकते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक प्रतीकात्मक दिवस नाही. तो आपल्याला आपल्या सभोवतालच्या निसर्गाची आठवण करून देणारा दिवस आहे. चिमणीसारख्या छोट्या पक्ष्याची संख्या कमी होत असल्याची जाणीव आपल्याला पर्यावरणाबद्दल अधिक संवेदनशील बनवते. शहरांच्या विकासाबरोबरच निसर्गाचे संतुलन राखणे आवश्यक आहे, अन्यथा अनेक प्रजाती आपल्या नकळत नाहीशा होऊ शकतात.
चिमणी ही फक्त एक पक्षी प्रजाती नाही, ती आपल्या घराच्या अंगणातील, बालपणातील आणि संस्कृतीतील एक जिवंत आठवण आहे. तिचा किलबिलाट हा निसर्गाच्या सजीवतेचे प्रतीक आहे. त्यामुळे चिमण्यांचे संरक्षण करणे म्हणजे केवळ एका पक्ष्याचे रक्षण नव्हे, तर आपल्या पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे होय.