Palghar Earthquake: तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचा धक्का; ३.६ रिश्टर स्केलची तीव्रता

अवघ्या पाच किलोमीटर खोलीवर केंद्र, नागरिकांमध्ये भीती
Dahanu Talasari Earthquake
Dahanu Talasari EarthquakePudhari
Published on: 
Updated on: 

सुरेश वळवी

तलासरी: पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसराला शनिवारी रात्री पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ३३ मिनिटे ४६ सेकंदांनी पालघर जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली केवळ पाच किलोमीटर होती. भूकंपाची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने केली आहे.

रात्रीच्या वेळी बहुतांश नागरिक घरात असतानाच अचानक जमीन हादरल्याचा अनुभव आला. काही ठिकाणी खाटा, घरातील वस्तू आणि भांडी हलल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या हादऱ्यामुळे अनेकांची झोप उडाली, तर काही नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले.

“झोपण्याच्या तयारीत असताना अचानक खाट हलल्याचा भास झाला आणि मोठा आवाजही ऐकू आला,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाचे अक्षांश २०.०४७ आणि रेखांश ७२.९७४ असून केंद्र पालघर जिल्ह्यात नोंदवले गेले आहे.

Dahanu Talasari Earthquake
European Roller Bird: मध्य आशिया ते आफ्रिका प्रवास करणाऱ्या ‘युरोपियन रोलर’चे खारघरमध्ये दर्शन

भूकंपाची खोली पाच किलोमीटर असल्याने तुलनेने कमी खोलीवरील या हालचालीचा परिसरातील नागरिकांना धक्का जाणवला. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या तरी २६ सप्टेंबरच्या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाल्याची अधिकृत नोंद नाही. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे डहाणू-तलासरी पट्ट्यातील भूकंपीय हालचालींचे बारकाईने निरीक्षण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

२०१८ पासून भूकंपाच्या मालिकेने लक्ष वेधले

पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी पट्टा भूकंपाच्या दृष्टीने चर्चेत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे २०१८ पासून सुरू झालेली भूकंपांची मालिका. वैज्ञानिक अभ्यासांनुसार पालघर परिसरात नोव्हेंबर २०१८ पासून २०२४ पर्यंत भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करण्यात आले.

या काळात २,३९३ पेक्षा अधिक भूकंपांची नोंद झाली असून त्यापैकी २० भूकंपांची तीव्रता तीन रिश्टरपेक्षा अधिक होती, अशी संशोधनातील आकडेवारी आहे. या प्रकारच्या सलग छोट्या भूकंपांच्या मालिकेला ‘भूकंपांचा समूह’ असे म्हटले जाते.

Dahanu Talasari Earthquake
Local Train Safety: मुंब्रा रेल्वे सुरक्षेला बळ; स्वयंचलित दरवाजांचा मार्ग मोकळा

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन

डहाणू-तलासरी परिसरात यापूर्वीही कमी तीव्रतेचे भूकंप वारंवार जाणवल्याने प्रत्येक धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. मात्र, केवळ ३.६ रिश्टर स्केलचा धक्का झाला म्हणून मोठ्या भूकंपाची शक्यता निश्चित होते, असा निष्कर्ष काढता येत नाही.

पालघर परिसरातील भूकंपीय हालचालींचे वैज्ञानिकांकडून सातत्याने निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि अधिकृत भूकंप नोंदींकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

याच वर्षी अनेकदा हादरला पालघरचा परिसर

पालघर जिल्ह्यातील भूकंपाची मालिका यंदाही पूर्णपणे थांबलेली नसल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीवरून दिसून येते. २५ जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यात ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला होता. त्याची खोली नऊ किलोमीटर होती. त्यानंतर ३१ जुलै रोजी ३.५ रिश्टर स्केलचा, पाच किलोमीटर खोलीवरील भूकंप नोंदवण्यात आला.

ऑगस्टमध्येही ३ ऑगस्टला २.७ रिश्टर स्केलचा, तर १० ऑगस्टला ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. १० ऑगस्टच्या भूकंपाची खोली पाच किलोमीटर होती.यामुळे २६ सप्टेंबरच्या ३.६ रिश्टर स्केलच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत डहाणू-तलासरी आणि पालघरच्या आसपासच्या भागात कमी तीव्रतेचे भूकंप वारंवार नोंदवले गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news