Surya Project Irrigation Water: सूर्या प्रकल्पातून प्रथमच सिंचनासाठी पाणी बंद

खरीप हंगामातील नुकसानी नंतर उन्हाळी शेतीही संकटात; पालघर-डहाणूतील ४,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित
Surya Project Irrigation Water
Surya Project Irrigation WaterPudhari
Published on: 
Updated on: 

डहाणू: कमी पाऊस आणि घटलेल्या पाणी साठ्यामुळे यंदा पालघर आणि डहाणू तालुक्यांतील शेतकऱ्यां समोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. सूर्या प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच धामणी व कवडास धरणांतून डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे उन्हाळी शेतीसाठी पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील १०० हून अधिक गावांमधील सुमारे ४,५०० हेक्टर शेतीला सिंचनाचे पाणी मिळणार नाही. आधीच खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Surya Project Irrigation Water
Wada Kolam Rice Production: अवकाळी दुष्काळाचा वाडा कोलमला मोठा फटका; ७० टक्के उत्पादन घटले!

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातशेतीला सुरुवाती पासूनच फटका बसला. भातपिकांना फुले आल्यानंतर परतीच्या पावसानेही दडी मारल्याने दाणे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. परिणामी, यंदा भाताचे उत्पादन केवळ ३० ते ४० टक्क्यांपर्यंत राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हातात आलेले पीक कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Surya Project Irrigation Water
Palghar Scrap Godown Fire: पालघरमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग; दोन छोटे टेम्पो जळून खाक

त्यात आता उन्हाळी हंगामासाठी कालव्यांचे पाणी बंद झाल्याने भातशेती, भाजीपाला आणि इतर पिकांची लागवडही करता येणार नाही. सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर अवलंबून असलेले शेतकरी भात शेतीनंतर पालेभाज्या व इतर पिकांची लागवड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवला जातो.

मात्र, यंदा सिंचनाचे पाणी मिळणार नसल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पाच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना पालघर आणि डहाणू या तालुक्यांचा यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

खरीप पिकांचे नुकसान आणि उन्हाळी सिंचन बंद अशा परिस्थितीत येथील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व नुकसान भरपाई पासूनही वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात शेतीचे नुकसान होत असताना पालघर आणि डहाणू तालुक्यांना दुष्काळग्रस्त का जाहीर केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

शेतीचे उत्पन्न घटल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगारासाठी ठाणे, नवी मुंबई, वसई तसेच गुजरातमध्ये स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर आणि डहाणू तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

धामणी आणि कवडास धरणांतील पाणीसाठा मागील वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षाकमी असल्याने उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. शासनाच्या निर्णया नुसार यंदा डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार नाही. ऑगस्ट २०२७ पर्यंत अल निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, उन्हाळ्यात लाभ क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासल्यास मागणी नुसार समितीची मंजुरी घेऊन पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

- सचिन पाटील, कार्यकारी अभियंता, सूर्या पाटबंधारे विभाग

कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळणार नसेल, तर शेतकऱ्यांनी स्थलांतर करायचे का? यंदा कमी पावसामुळे भात पिकाचे उत्पादन घटले असून, उन्हाळी हंगामातील भातशेती आणि पालेभाज्यांची लागवडही पाण्या अभावी करता येणार नाही. शेती हाच आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. मात्र, स्थानिक भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने गुजरातमध्ये स्थलांतर करण्याची वेळ येते. त्यामुळे डहाणू आणि पालघर या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.

- अशोक भोईर, शेतकरी, डहाणू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.