

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा परिसरात किराणा दुकानाच्या आडून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर मनोर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी सायंकाळी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत पोलिसांनी किराणा दुकानातून दीड किलो डोडा पावडर (अफू) जप्त केली. दुकान मालकाला अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथील अजय किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून किराणा दुकानावर कारवाई केली. दुकानाची झडती घेतली असता पोलिसांना दीड किलो वजनाची डोडा पावडर नामक अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या डोडा पावडरची किंमत सुमारे पंधरा हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. किराणा दुकान मालक अजय झा याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) कलम ८ (क) आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गालगतच्या परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाई मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस हवालदार राजेंद्र आतकारी, पोलीस शिपाई नागेश निल आणि योगेश आहेर यांच्या पथकाने केली.