

Fire Incident In Boisar
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी (दि.१६) आगीच्या दोन स्वतंत्र घटनांनी अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडवली. जुन्या निरलॉन कंपनीच्या विस्तीर्ण आवारातील सुकलेल्या गवताला आग लागली, तर दुसरीकडे विराज प्रोफाइल कंपनीच्या आवारातील कच्चा माल भरलेल्या प्लास्टिकच्या गोण्यांनी पेट घेतला. दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.
तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक डी-८ येथे असलेल्या जुन्या निरलॉन कंपनीच्या विस्तीर्ण आवारात दुपारी सव्वादोनच्या सुमारास सुकलेल्या गवताला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आवाराचा मोठा विस्तार आणि घटनास्थळापर्यंत अग्निशमन वाहन पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणींमुळे जवानांसमोर आग विझविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले.
अशा प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी हार न मानता प्रत्येकी ५० फूट लांबीचे दहा फायर फायटिंग होज पाइप एकमेकांना जोडून तब्बल ५०० फूट अंतरापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली. तरीही काही भागांपर्यंत पाणी पोहोचविण्यात अडचणी येत असल्याने उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करीत जवानांनी झाडांच्या फांद्यांच्या साहाय्यानेही आग विझविण्याचे प्रयत्न केले. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
दरम्यान, निरलॉन कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असतानाच एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जी-२ येथील विराज प्रोफाइल कंपनीच्या आवारात आग लागल्याची दुसरी माहिती अग्निशमन दलाला मिळाली. कंपनीच्या आवारात कच्चा माल भरलेल्या काही प्लास्टिकच्या गोण्यांनी पेट घेतला होता. जवानांनी तातडीने दुसऱ्या घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आग विझविली.
दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. मात्र, एकाच दिवशी औद्योगिक वसाहतीत दोन ठिकाणी आग लागल्याने परिसरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तारापूर एमआयडीसीत वारंवार आगीच्या घटना घडत असताना कंपन्यांच्या आवारातील अग्निसुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषतः विस्तीर्ण मोकळ्या भूखंडांवरील सुकलेले गवत, झुडपे आणि ज्वलनशील साहित्य आगीचा धोका वाढवित आहेत. निरलॉन कंपनीतील आगीच्या वेळी अग्निशमन दलाला तब्बल ५०० फूट पाइप जोडून पाणी पोहोचवावे लागले, ही बाब औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन सुविधांच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने मोकळ्या भूखंडांची नियमित स्वच्छता, अग्निशमन वाहनांसाठी सुलभ मार्ग आणि आवश्यक अग्निसुरक्षा साधनसामग्रीची उपलब्धता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.