Gram Panchayat Election Results: मोखाड्यात भाजपची पिछेहाट; शरद पवार गटाची मुसंडी

Gram Panchayat Election Results: मोखाड्यात भाजपची पिछेहाट; शरद पवार गटाची मुसंडी


मोखाडा: मोखाडा तालुक्यातील चुरशीच्या झालेल्या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत भाजपला चारीमुंड्या चीत केले आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून दोन ग्रामपचायती जिंकल्या आहेत. भाजपला मात्र एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरूवातीला शर्यतीत नसलेल्या राष्ट्रवादीने आपला करिश्मा दाखवत सर्वांनाच धक्का दिला आहे. तर पाचपैकी तीन ग्रामपंचायतीवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तालुक्यातील पाचपैकी राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोन आणि भाजप एक अशा ग्रामंचायती जिंकल्याचे एकूणच चित्र आहे. (Gram Panchayat Election Results)

तालुक्यातील चास, किनिस्ते सायदे, डोल्हारा आणि कारेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक अशा एकूण पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. यामध्ये भाजपचा मात्र धुरळा उडाला आहे. कारण या पाचही निवडणुका सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. चास ग्रामपंचायत याआधी राष्ट्रवादीकडे होती. यावेळी मात्र, शिवसेना शिंदे गटाने जिंकली आहे. तर डोल्हारा येथे शिवसेनेची सत्ता होती. तिथे यावेळी भाजपने विजय मिळवला आहे. (Gram Panchayat Election Results)

या ठिकाणी राष्ट्रवादीने निवडणूक लढवली नव्हती. तर किनिस्ते येथे भाजपची सत्ता होती. तिथे शिवसेनेने मोठा विजय मिळवला आहे. सायदे ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता होती. तसेच हे गाव शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. त्याचबरोबर कारेगाव सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार विजय मिळवला. तर जिजाऊ संघटनेकडून फक्त एकच ग्रामपंचायत लढवण्यात आली होती तिथे त्यांचा पराभव झाला.

मुळात या निवडणुका वेळी राष्ट्रवादीकडून भाजपवर धनशक्तीचा आरोप करण्यात आला होता. भाजपच्या मोठया नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकांत लक्ष घातले होते. तर भाजपचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी निवडणुका अगोदर पाचही ग्रामंचायती जिंकण्याचा दावा केला होता. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

निवडून आलेले सरपंच असे

ग्रामपंचायत                   सरपंच                       पक्ष

चास                     प्रियांका गोविंद                  शिवसेना शिंदे गट
डोल्हारा                ताईबाई जाधव                  भाजप
कारेगाव                मुरलीधर कडू                   राष्ट्रवादी शरद पवार
सायदे                   सिंधू झुगरे                        राष्ट्रवादी शरद पवार
कीनिस्ते                योगेश दाते                       शिवसेना शिंदे गट

आमचा बालेकिल्ला असलेला डोल्हारा ग्रामपंचायतीमध्ये आमचा पराभव झाला. मात्र, आम्ही चास आणि किनिस्ते या ग्रामपंचायती जिंकल्याचा मनस्वी आनंद आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार.

– प्रकाश निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर

आम्ही राष्ट्रवादीकडून चार ग्रामपंचायती लढलो. त्यातील दोन ग्रामपंचायती जिंकलो. खरे तर भाजपकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही प्रचंड ताकद लावण्यात आली होती. मात्र, निवडणुका फक्त पैशांनी जिंकता येत नाही, हे जनतेने दाखवून दिले. भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मिळवलेला विजय हा माझ्या शेवटच्या कार्यकर्त्याचा विजय आहे. सर्व राष्ट्रवादी प्रेमी लोकांचे पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन.

– सुनिल भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा

जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. काहीं ठिकाणी आमच्यात दुफळी होती. त्यामुळे आमचे नुकसान झाले. आम्ही सर्व ठिकाणी चांगल्या लढती दिल्या. आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. या पराभवातून खचून न जाता आम्ही जोमाने लढू. सायदे, डोल्हारा या ठिकाणी आमचे उपसरपंच होणार आहेत.

– संतोष चोथे, भाजपा तालुकाध्यक्ष

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news