

तलासरी : सुरेश वळवी
तरुणाईच्या हाती भन्नाट वेगाच्या मोटार सायकली आल्या, पण आपल्या जीवाची व घरच्यांची काळजी न करता त्या धूमस्टाइलने चालविण्याच्या नादामुळे त्यांच्या होणाऱ्या अपघातात वाढ होते आहे. तिच्या गतीवर नियंत्रण ठेवता न आल्याने अशा अपघातात मृत व जखमी होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तलासरी पोलिस स्टेशन हद्दीत जानेवारी ते डिसेंबर आता पर्यंत 46 वाहन अपघात होऊन त्यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी नोंद करण्यात आलेल्या अपघातांची आहे. तर काही झालेल्या लहान अपघातांची नोंद केली जात नाही.
तलासरी भागात अपघातात मृत्यूची संख्या मोठी असताना ना तरुणाई, ना पालक याचा विचार करत. मोटरसायकलचा भन्नाट वेग गाडीवर तीन जण हे चित्र तलासरी भागात सर्रास पहावयास मिळते. कहर म्हणजे त्यातले काही मुले अल्पवयीन असतात. पण यावर पोलिसां कडून कोणतीच कारवाई होत नाही, या भन्नाट वेगात मोटारसायकल चालविण्याऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी येथील नागरिक नेहमीच पोलिसां कडे करतात त्यामुळे तलासरी पोलिसांनी वाहन चालकांचे प्रबोधन आणि कारवाई अशी मोहीम सुरू केली आहे यात गेल्या पंधरा दिवसात 10 जणांवर मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
तलासरी बाजारपेठेत तर भन्नाट उपयोग वेगाच्या मोटारसायकल स्वारांनी तर थैमान घातले आहे, शाळा कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत तर यात वाढ होते. यावेळी रस्त्यावरुन चालणे सामान्य जनांना तर मुश्किल होते, काही मोटारसायकलस्वारांनी गाड्यांचे सायलेन्सर काढून टाकले असून ते बाजार पेठेतून कर्णकर्कश्श आवाज करीत त्या फिरवीत असल्याने ध्वनी प्रदूषणवाढी बरोबर रुग्णांना त्याचा मोठा त्रास होतो. डीजे प्रमाणेच अशा मोटारसायकलींवरही बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
भन्नाट वेगामुळे तलासरी भागात दररोज मोटारसायकलींना अपघात होऊन चालक जखमी वा मृत होतोच त्याच बरोबर रस्त्यावरून चालणारा पादचारी ही गंभीर जखमी होतो. वास्तविक पालकांनीच आपल्या मुलांना या बाबत समज दिली पाहीजे पण मुलांच्या आनंदासाठी त्याला पालकच महागड्या गाड्या घेऊन देतात पण त्याला समज देत नसल्याने वेगात गाडी चालविण्याने अपघात होऊन बळी गेल्यावर पश्चाताप करण्याची वेळ पालकांवर येते.