

विरार ः चेतन इंगळे
वसई- विरार शहर आणि परिसरात गेल्या एक वर्षाच्या कालावधीत घडलेल्या 39 हत्यांच्या घटनांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सातत्याने घडणाऱ्या हत्या, मारहाण, टोळीयुद्ध आणि किरकोळ वादातून होणारे रक्तरंजित प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कायदासुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून अनेक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात 9 हत्या, मीरा-भाईंदर शहरात 11 हत्या, वसई परिसरात 15 हत्या, तर विरार शहरात 13 हत्या घडल्या आहेत. या सर्व घटनांची एकूण संख्या 39 इतकी असून हा आकडा परिसरातील वाढती गुन्हेगारी स्पष्टपणे अधोरेखित करतो. विशेष म्हणजे बहुतांश हत्या या जुन्या वादातून, कौटुंबिक भांडणातून, प्रेमप्रकरणातून तसेच किरकोळ कारणांवरून झाल्याचे समोर आले आहे.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात अवघ्या 48 तासांत चार हत्यांच्या घटना घडल्या असून त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन भवन परिसरात जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विरार पूर्वेकडील चंदनसार परिसरात किरकोळ वादातून पवार नामक दांम्पत्यामध्ये वाद झाले. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले असून त्यात पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वसईतील वाळीव परिसरात सकाळच्या सुमारास एका तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. मृत तरुणाचे वय 25 ते 30 वर्षांदरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून त्याच्या शरीरावर 7 ते 8 वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. याच काळात वसईतच सरोज सर्फ आणि योगेश सर्फ या दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले. सरोज सर्फ याने योगेश सारखी याच्यावर हल्ला केला असून त्यात योगेश सारखी याचा मृत्यू झाला. सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.
सतत वाढणाऱ्या हत्या, दरोडे, मारहाण आणि धारदार शस्त्रांच्या वापरामुळे वसईविरार परिसर गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अनेक नागरिकांनी पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर कडक कारवाई करावी आणि कायदासुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.