

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील पाचमाड या गावातील गणेश मंदिराने सध्या संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिराच्या आकर्षक व मनमोहक रंगसंगतीमुळे हे मंदिर चर्चेचा विषय ठरले असून पालघर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दररोज असंख्य भाविक व पर्यटक येथे भेट देत आहेत.
पाचमाड गावातील स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा रंगरूप बदलण्यात आला. विविध आकर्षक रंगांच्या संगमातून तयार केलेल्या सजावटीमुळे मंदिर अधिक उजळून निघाले आहे. मंदिराच्या भिंतींवर केलेल्या कलापूर्ण नक्षीकामामुळे याचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे.
प्रसाद व महाआरतीच्या कार्यक्रमांना वाढती गर्दी दिसून येत असून श्री गणेशाच्या दर्शनासाठी दूरदूरहून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: आठवड्याच्या शेवटी व सुट्ट्यांच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते.
मंदिर परिसर तसेच आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक युवक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थ सांगतात. धार्मिक श्रद्धेबरोबरच मंदिराचे नयनरम्य सौंदर्य हे पाचमाड गावाला नव्या धार्मिक पर्यटनस्थळाच्या रूपात ओळख निर्माण करून देत आहे.
या मंदिराच्या सौंदर्यीकरणामुळे गावाला नवे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व प्राप्त होत असून स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गणेश भक्तांसाठी पाचमाडचे हे गणेश मंदिर एक प्रेरणादायी व भक्तिमय केंद्र बनले असून येणाऱ्या काळात येथे अधिक सुविधा निर्माण करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.