

वसई : नालासोपारा येथील सोपारा गावातील जिल्हा परिषद शाळेत आज दुपारी खिचडी बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन मदतनीस महिला व दोन विद्यार्थी भाजले. एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली, तर १० वर्षीय विद्यार्थ्याचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून त्याला डोळे उघडणेही कठीण होत आहे.
गंभीर बाब म्हणजे दुर्घटनेनंतर मुख्याध्यापिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती न देता तसेच गंभीर जखमी मुलाला रुग्णालयात दाखल न करता पालकांसोबत पाठविल्याचे समोर आले आहे. पालकांनी मुलाला विविध ठिकाणी उपचारासाठी नेल्यानंतर संजीवनी रुग्णालयात आणले. घटनेचे वृत्त प्रसारमाध्यमांवर आल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांच्या पाठपुराव्यानंतर मुलाला दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी तातडीने महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आणि मंत्रालयातून थेट संजीवनी रुग्णालयात पोहोचून जखमी मुलाची व त्याच्या पालकांची भेट घेतली. मुलाच्या जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट यांच्या विनंतीवरून वरिष्ठ डॉक्टर डॉ. बारोट विशेष तपासणीसाठी रुग्णालयात आले.
तपासणीनंतर त्यांनी मुलाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णवाहिकेसह मुलाला मुंबईत हलविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली.
आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुलाच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेने घेण्याची तसेच मुंबईत त्याच्या पालकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर उपचारांची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद घेईल, असे मनोज रानडे यांनी आश्वस्त केले.
शाळा प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मुख्याध्यापिका व अन्य जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
युवासेनेचा संतप्त सवाल
या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेनेचे जिल्हाप्रमुख अतुल काकासाहेब मोटे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने जखमी विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असून, त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याची भूमिका अतुल मोटे यांनी मांडली.