

वसई : नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात असलेल्या ‘केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी तीन डॉक्टरांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेतील आचोळे येथे केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोणतीही वैध परवानगी नसताना गर्भपात केला जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पांढरे आणि डॉ. कृष्णा गोसावी यांना रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुरुवार, 22 जानेवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करत केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीत रुग्णालयात कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तींना गर्भपात करण्याचा वैधानिक अधिकार नसतानाच आवश्यक शैक्षणिक अर्हताही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणात रुग्णालयाचा संचालक डॉ. चंद्रकांत शंभुनाथ मिश्रा व अरुण शुक्ला, तसेच संतोष भवन, वालईपाडा येथील कुशल क्लिनिकचा डॉ. संजीव सिंग हा दोषी आढळून आले आहेत. त्यानुसार वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधितांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.