Nalasopara flyover pillar posters : नालासोपाऱ्यात उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टरबाजी

मनपाच्या आदेशाला केराची टोपली, शहरात स्वच्छतेचा बोजवारा
Nalasopara flyover pillar posters
नालासोपारा उड्डाणपुलpudhari photo
Published on
Updated on

विरार ः नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या पिलरवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टरबाजी पुन्हा वाढू लागली असून, महापालिकेने वारंवार केलेल्या आवाहनांना सर्रास धाब्यावर बसवले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जाहिरात लावू नये, दंड आकारण्यात येईल अशा स्पष्ट चेतावण्या देऊनही प्रत्यक्षात त्या चेतावण्या किती प्रभावहीन ठरल्या आहेत, हे या ठिकाणची स्थिती पाहिल्यावर सहज स्पष्ट होते.

उड्डाणपुलाचा हा पिलर शहराच्या वर्दळीच्या मध्यभागी येत असल्याने हजारो नागरिकांचे दररोज या ठिकाणी लक्ष जाते. परंतु पिलरभर चिकटवलेल्या डॉक्टरांच्या जाहिराती, क्लासेसचे फलक, लोन मिळवा अशा भ्रामक घोषणा, पैशासाठी मुलं हवी अशी जाहिरात, हॉटेल्सच्या ऑफर्स, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे पोस्टर्स या सर्वांनी मिळून संपूर्ण परिसराचे सौंदर्य अक्षरशः विद्रूप केले आहे.

Nalasopara flyover pillar posters
Vasai Virar plastic pollution : वसई- विरार शहर अडकले प्लास्टिकच्या जंजाळात !

महापालिकेच्या स्वच्छता विभागाने अनेकदा मोहीम राबवून ही पोस्टर्स काढण्याचे काम केले असले तरी दुसऱ्या दिवशी हीच परिस्थिती पुन्हा जैसे थे निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत. पोस्टरबाजांना कोणतीही भीती किंवा दंडाची वास्तविक अंमलबजावणी नाही, यामुळेच या बेकायदेशीर धंद्याला उधाण आल्याचे नागरिकांचे मत आहे.

नालासोपारा परिसरात वेगाने होत असलेली लोकसंख्या वाढ आणि व्यापारीकरणामुळे जाहिरातदारांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. शहरात अधिकृत जाहिरात फलक उपलब्ध नसल्याने किंवा त्यांचे दर जास्त असल्याने अनेक जण उड्डाणपुल, सार्वजनिक भिंती, पिलर्स, बसस्थानके आणि इतर सरकारी मालमत्ता जाहिरातींसाठी ‌‘मोकळे मैदान‌’ समजून वापरत आहेत. त्यामुळे शहर नियोजनाचे चित्रच बिघडत चालले आहे.

Nalasopara flyover pillar posters
Vasai Christmas celebrations : वसईत नाताळच्या आगमनास प्रारंभ

महापालिकेने पूर्वी काही वेळा पोस्टर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष कारवाईची संख्या अत्यल्प असल्याने नियम अक्षरशः कागदावरच राहिले आहेत. स्वच्छ भारत अभियान, सुंदर शहर अभियान यांची घोषणा मोठ्या आवाजात केली जाते, परंतु वास्तविक अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचे प्रखर वास्तव समोर येत आहे.

या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या मनात रोष वाढत आहे. एकीकडे शहराच्या विकासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणे अशा प्रकारे जाहिरातींनी झाकली जाणे ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत. “महापालिकेचे कर्मचारी पोस्टर काढतात, पण दुसऱ्या दिवशी दहा नवीन पोस्टर पुन्हा चिकटलेले दिसतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर कठोर, सातत्यपूर्ण कारवाई आणि तंत्रज्ञानाधारित देखरेख आवश्यक आहे,” अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

कठोर कारवाईची गरज

लोकसहभाग, दंडात्मक कारवाई, अधिकृत जाहिरात फलकांची वाढ आणि कडक देखरेख हे उपाय तत्काळ राबवले नाहीत तर नालासोपारा शहराची सुंदरता आणि शिस्त दोन्ही धोक्यात येतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news