

पालघर शहर ः पालघर शहरातील मुख्य बाजारपेठ पेठेतील नाकोडा ज्वेलर्समध्ये सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम असा करोडो रुपयांचा मुद्देमालावर दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी नेपाळ येथील रहिवासी असून अटक आरोपींकडून 3 कोटी 28 लाख 18 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालघर शहरातील अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाचे मालक शनिवारी रात्री वाजता ज्वेलर्स दुकान बंद करून आपल्या घरी निघून गेले. चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी असलेल्या कपड्याच्या दुकानात शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपड्याच्या दुकानातील भिंतीला भगदाड पाडून नाकोडा ज्वेलर्स दुकानात शिरले.
ज्वेलर्स दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यात ठेवलेल्या 92 सोन्याच्या चेन, 31 नेकलेस, 271अंगठ्या, 359 कानातील एअररिंग्स टॉप्स आणि झुमके, 120 कानातील रिंग्स, 92 मंगळसूत्राला लावण्यात येणारे पेंडल, 146 सोन्याच्या चेनचे पेंडल, 19 कानचेन, 8 ब्रेसलेट, 12 कानातले लटकन, बारा सोन्याचे कॉइन, 40 किलो चांदीचे दागिने आणि 20 लाख रुपये रोख रक्कम असा 3 कोटी 72 लाख 35 हजार 460 रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विविध पथके नेमण्यात करण्यात आली. अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनी एकत्रितरित्या दिपक सिंग आणि नरेश अशा दोन सुरक्षारक्षकांना दहा हजार रुपये पगारावर कामावर ठेवले होते. दोघेही नेपाळचे रहिवासी असून या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षारक्षक म्हणून ठिकाणी कार्यरत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 5 ते 6 चोरटे ही घरफोडीसाठी आले असल्याचे आढळून आले.
आरोपी नेपाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले गुजरात येथून नेपाळच्या दिशेने पलायन केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर पालघर पोलिसांची पथके नेपाळच्या दिशेने रवाना करण्यात आली. आरोपींचा माग काढून नेपाळ बॉर्डरवर जाऊन तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिपक नरबहादुर सिंग, भुवनसिंग जवान सिंग चेलाऊने, जीवनकुमार रामबहादुर थारू, खेमराज कुलपती देवकोटा या चार आरोपींना आणि गुजरात राज्यातील सुरत येथून अर्जुन दामबहादुर सोनी अशा पाच आरोपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली.