Palghar Dhanivari Accident | “हा अपघात नाही, व्यवस्थेने केलेला खून”: सुरक्षित क्रॉसिंगच्या अभावामुळे १३ जणांचा बळी

सुरक्षित सर्विस रोड, भरणी, उड्डाणपूल किंवा योग्य क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना राँग साईडने रस्ता पार करावा लागतोय
Mumbai Ahmedabad highway accident
Mumbai Ahmedabad highway Pudhari
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad highway accident

निलेश कासट

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेत १३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करत “हा अपघात नसून व्यवस्थेने केलेला खून आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धानिवरी परिसरातील खडकीपाडा आणि मालपाडा या दोन पाड्यांमध्ये सुमारे ७०० ते ८०० नागरिक वास्तव्यास असून, या भागातील ग्रामस्थांना दररोज जीव धोक्यात घालून राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षित सर्विस रोड, भरणी, उड्डाणपूल किंवा योग्य क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रॉंग साईडने रस्ता पार करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Mumbai Ahmedabad highway accident
Palghar Accident | धानिवरी दुर्घटनेतील १२ मृतांवर बापुगाव येथे सामूहिक अंत्यसंस्कार

सामाजिक कार्यकर्ते शैलेश तांबडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात धानिवरी येथील हा भाग “ब्लॅक स्पॉट” घोषित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा हायवे प्रशासनाकडे केली होती, असा दावा केला आहे. याबाबत हायवे प्रशासनाचे अधिकारी सुहास चिटणीस यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

“येथे तातडीने भरणी करा, सर्विस रोड उपलब्ध करून द्या आणि नागरिकांचे जीव वाचवा,” अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. तरीही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच १३ जणांना जीव गमवावा लागला, असा गंभीर आरोप तांबडा यांनी केला आहे.

Mumbai Ahmedabad highway accident
Palghar Fatal Accident : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत : पालकमंत्री गणेश नाईक

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून पालकमंत्री गणेश नाईक यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मात्र केवळ आर्थिक मदत जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही, अशी भावना स्थानिक आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी अपघातस्थळाच्या पुढे कट असल्याचे म्हटले असले तरी तो कट तब्बल ६०० ते ७०० मीटर अंतरावर असल्याने महिला, वृद्ध आणि शाळकरी मुलांनी एवढे अंतर चालत जाऊन रस्ता ओलांडायचा का, असा सवालही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Mumbai Ahmedabad highway accident
Palghar Bird House Activity : पालघरमध्ये चिमुकल्यांच्या हातून पक्ष्यांसाठी ‌‘घरकुल‌’

स्थानिक आमदार, खासदार, हायवे प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी वेळेत लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यासोबतच धानिवरी येथील धोकादायक “ब्लॅक स्पॉट” तात्काळ सुरक्षित करण्यात यावा, स्थानिकांसाठी स्वतंत्र सर्विस रोड उभारण्यात यावा आणि कायमस्वरूपी सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news