

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली उड्डाणपूल वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरत असताना उड्डाणपुलालगतच्या वांद्री नदीवरील पुलाचा पेडस्टल स्टोन फुटल्याने पूल वाहतूकीसाठी धोकादायक झाला आहे. धोकादायक झालेल्या पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्यामुळे पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी असलेला जुना पूल जीर्ण झाल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पेडेस्टल स्टोन फुटलेला पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यास सातिवली आणि वरई भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण निर्माण होऊन वाहन चालकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुलाच्या पेडेस्टल स्टोनची दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामा- दरम्यान पालघर तालुक्यातील वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवर महामार्गाच्या मुंबई वहिनीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती. जुना पूल गुजरात वहिनीसाठी तर नवीन पूल मुंबई वहिनीवरील वाहनांच्या रहदारीसाठी वापरला जात होता. दरम्यान सहापदरीकरणाच्या कामात गुजरात वहिनीवर तीन मार्गीका असलेला नवीन पूल बांधण्यात आल्याने जुन्या पूलावरील वाहतूक बंद करून गुजरात मार्गीकेवरील वाहतूक नवीन पुलावरून सुरु करण्यात आली होती. जुना पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
सहाशे कोटी खर्च करून मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याच कामा अंतर्गत सातिवली येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे सातिवली ते वरई उड्डाणपूल परिसर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरला होता. उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे जून महिन्यात दहा दिवस वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूककोंडी आणि पुलावरील खड्ड्यांमुळे वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवरील मुंबई वहिनीवरील पुलाच्या पिलर वरील पेडेस्टल स्टोन फुटल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वाहनांचा भार पेलणारा गर्डर दबण्याची शक्यता
पुलाचा पेडेस्टल स्टोन फुटल्यामुळे पुलावरील वाहनांचा भार पेलणारा गर्डर दबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. फुटलेल्या पेडेस्टल स्टोनमुळे पूल नादुरुस्त होऊन पुलावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ असलेला महामार्गावरील पुलावर वाहतूक बंद झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे.
वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वांद्री नदीवरील पुलाची पाहणी तसेच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच वाहतूक बाधित न करता फुटलेल्या पेडेस्टल स्टोनच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याची मागणी केली जात आहे. पुलाच्या दुरुस्ती बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
वांद्री नदीवरील पूल धोकादायक झाला आहे, तात्काळ दुरुस्तीचे काम सुरु केले पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाहनचालकांचे बळी जाण्याची वाट पाहत आहे?
प्रवीण नारगोळकर, स्थानिक ग्रामस्थ, ढेकाळे.