खोडाळा ः गेल्या महिनाभरापासुन मोखाड्यात बिबट्याने हैदोस घातला आहे. रोजच कुठे ना? कुठे? बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. वेगवेगळ्या भागात कोंबड्या, बकऱ्या घरातून फस्त केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सोमवारी 24 नोव्हेंबरला सकाळी बिबट्याने एका तिसरीत शिकणाऱ्या खोच येथील शाळकरी मुलावर हल्लाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. परंतु कुटूंबियांच्या सतर्कतेमुळे बालक सुखरूप बचावले आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोखाडा तालुक्यात बिबट्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक गावपाड्यांत त्याने बकऱ्या, कोंबड्या, कुत्रे फस्त केले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर एका दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला होता. या घटना ताज्या असतांना, सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिपंळपाडा येथील संकेत सुनिल भोये वय (9) हा सकाळी सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात येऊन बसला होता.
त्याला पाहता क्षणीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु दारात बसलेल्या आजी व कुटूंबियांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व बालक सुखरूप बचावला आहे. मात्र, या घटनेने गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणाऱ्या बिबट्याची मजल आता माणसांवर हल्ला करण्यापर्यत येऊन ठेपल्याने, नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
संकेत सकाळी शेकोटी पेटवायला घराच्या बाहेर येऊन घराच्या कोपऱ्यावर बसला होता, त्याला बिबट्याने बघितले आणि कुंपणावरून उडी मारून धावून आला.परंतु माझ्या आईने व घरातील व्यक्तींनी जोरात आरडा ओरडा केल्याने बिबट्या तिथून पळाला संकेतला कोणतीही इजा झाली नाही पळताना गुडघ्याला किरकोळ लागले असल्याचे संकेतचे काका केशव भोये याने सांगितले आहे. दरम्यान, घटनास्थळी जाऊन पहाणी करून पुढील कार्यवाही तातडीने करणार असल्याचे वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी सांगितले आहे.