

पालघर : हनिफ शेख
देशाने स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा केला. देश डिजिटल होत चालला आहे असा दावा सत्ताधारी करीत आहेत अशा परिस्थितीत दररोजच्या जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य मिळविण्यासाठी केवळ गावात नेटवर्क नाही या कारणामुळे जर येथील कुटुंबांना दर महिन्याला तब्बल 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल तर हे कोणत्या प्रगतीचे द्याोतक आहे याचे उत्तर सरकारने देणे आवश्यक बनले आहे. कारण मोखाडा मुख्यालयापासून 25 किलोमीटर 9 किलोमीटर अंतरावर नाशेरा गाव आहे.
या ठिकाणी आज नेटवर्कची मोठी आभाळ निर्माण झाली आहे कोणत्याच कंपनीचे नेटवर्क या ठिकाणी येत नसल्याने अनेकदा ऑनलाइन कामासाठी किंवा आपला दररोजचा या जगाशी संपर्क ठेवण्यासाठी देखील त्यांच्याकडे नेटवर्क नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या गावापासून एक ते दोन किलोमीटर लांब गेल्यानंतर नेटवर्क येत असल्याचे कारण देत थेट या गावाला पालघर जिल्हा प्रशासनाकडून नो नेटवर्क गावाच्या यादीतून वगळले.
यामुळे झाले काय की रेशन दुकान गावात आहे मात्र ऑनलाइन थम्बिंग होण्यासाठी नेटवर्कची गरज असते यासाठी दर महिन्याला खोडाळा शहर किंवा दुधगाव या ठिकाणी जाऊन हे थंब द्यावे लागते आणि त्यानंतर येथील बांधवांना रेशन मिळते. यामुळे रेशनचे धान्य जरी गावात मिळत असेल मात्र त्यासाठी दर महिन्याला येथील ग्रामस्थांना तब्बल 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो यासाठी पूर्ण दिवस वाया जातो नाशेरा गावाची लोकसंख्या आज घडीला तब्बल १३०० ते १४०० आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी नेटवर्क येत होते मात्र आता तेही नाहीसे झाले तिथून मग ऑनलाइनची कोणतीही कामे या गावात होत नाहीत. साधं बोलण्यासाठी देखील नेटवर्क नसते मुळात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नेटवर्क नाही अशांचा सर्वे होऊन एक यादी देखील बनली जेणेकरून ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी नेटवर्क देण्याच्या ती काय व्यवस्था करता येईल यासाठी शासनाला पावले उचलायला मदत होईल असा या मागचा हेतू होता. मात्र काही दिवसांपूर्वी काही सरकारी अधिकारी येऊन गेले मात्र गावापासून अर्धा ते एक किलोमीटर लांब जाऊन या गावात नेटवर्क आहे असा अहवाल दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यामुळे हा गाव नो नेटवर्क गावांच्या यादीतून वगळला गेला यामुळे कित्येक वर्षापासून हे गाव नेटवर्क अभावी चाचपडत असल्याचे दिसून येते.
अंगठा मागू नका
तालुक्यातील या नाशेरा गावात सगळ्या नागरिकांना धान्य वितरित होते. मात्र गावात नेटवर्क नसल्याने बायोमेट्रिक प्रणालीसाठी थम्बिंग म्हणजेच अंगठा दिल्याशिवाय ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होत नाही ती झाल्याशिवाय रेशनचे धान्य देऊ शकत नाही. यामुळे आता रेशन साठी दर महिन्याला अख्या गावाला जावं लागत असल्याने एक तर शासनाने या ठिकाणी नेटवर्कची सोय उपलब्ध करून द्यावी नसेल तर तोपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली न वापरता पहिल्यासारख्याच रेशनचे धान्य द्यावे अशी मागणी येथील माजी सरपंच रवींद्र धिडे यांनी केली आहे.
नाशेरा गाव हे अगोदर नो नेटवर्क गावांचे यादीत होते मात्र मध्यंतरी वनपट्ट्यांच्या केवायसी दरम्यान गावाच्या आसपास नेटवर्क आल्याने ते या यादीतून वगळले गेले असावे मात्र मी स्वतः वैयक्तिकरित्या यामध्ये पाठपुरावा करीत असून हे गाव नो नेटवर्क यादीत समाविष्ट झाले असल्याने लवकरच या ठिकाणी नेटवर्क कसे येईल यासाठी मी पाठपुरावा करणार आहे .
रोहन शिंदे, तहसीलदार मोखाडा.