

पालघर : हनिफ शेख
शासनाचे काही नियम कसे विरोधाभास निर्माण करणारे असतात याची उदाहरणे पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अनेक कारभारावरून दिसून येतील.मोखाडा तालुक्यात दहा वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून गोमघर या ठिकाणी एक आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले होते. मात्र या ठिकाणी कर्मचारी देण्यासाठी तब्बल पाच वर्षाहून अधिक कालावधी लागला होता आता याचे दुसरे उदाहरण म्हणजे खोच या ठिकाणी एक कोटीहून अधिकचा निधी खर्च करून आरोग्य उपकेंद्र काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले बांधून झाल्यानंतर त्याची काही वर्षात दुरावस्था होऊन पुन्हा या इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र आजही या ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी दिलेला नाही.
सध्या या ठिकाणी एक सी एच ओ आणि एम पी डब्ल्यू कर्मचारी यांच्या जागा भरलेल्या आहेत. तर येथे परिचारिकेची जागा रिक्त असून वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेकडे इथला चार्ज देण्यात आलेला आहे. खरंतर कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीत कायमस्वरूपी एक वैद्यकीय अधिकारी रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी किमान दोन परिचारिका फार्मासिस्ट असा स्टाफ असणे आवश्यक असताना हे उपकेंद्र म्हणजे केवळ शोभेची वस्तू बनली आहे. यामुळे जर आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरता येणार नसतील तर कोट्यावधी रुपयाच्या अशा इमारती बांधून नेमका कोणता विकास शासन दाखवू इच्छित आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ही दोन उदाहरणे ताजी असताना आता कुर्लोद या ठिकाणी पुन्हा कोटी रुपयांचे उपकेंद्र बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे काही महिन्यातच हे उपकेंद्र तयार होईल. मात्र या ठिकाणी सुद्धा जर अशीच परिस्थिती राहिली.तर ही वास्तू सुद्धा काही दिवसातच भकास व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे कुर्लोद या ठिकाणी आत्ताच वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदे मंजूर करावीत अशी मागणी देखील आता समोर येत आहे.
मोखाडा तालुक्यात 16 उपकेंद्र चार प्राथमिक आरोग्य केंद्र 3 आरोग्य पथके आणि एक ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र या सर्वच आरोग्य केंद्रावर सुविधांची वाणवा असल्याने अनेकदा प्रसूतीसाठी सुद्धा नाशिक किंवा सेलवासचा आधार येथील गरोदर मातांना घ्यावा लागतो. यामुळे मोखाडा तालुक्यात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी याशिवाय स्त्री रोगतज्ञ बालरोग तज्ञ अधिकारी असणे आवश्यक आहे.मात्र तसं होताना दिसत नाही.
सध्या भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या मोखाडा तालुक्यात उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची देखील वाढ होणे आवश्यक आहे. अशावेळी शासनाकडून उपकेंद्रांना मंजुरी देखील भेटली आहे. त्याचाच प्रत्येय म्हणून मोखाडा तालुक्यातील भौगोलिक दृष्ट्या दुर्गम असलेल्या कुलोंद या ठिकाणी उपकेंद्राचे काम देखील सुरू आहे. मात्र याआधी सुद्धा गोमघर आणि खोच या ठिकाणी झालेल्या उपकेंद्रांची सध्या काय परिस्थिती आहे.याचा अनुभव घेता उपकेंद्र केवळ लोकांची बोळवण करण्यासाठी बांधली जात आहे का असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
आज खोच येथील उपकेंद्राची जर अवस्था पाहिली तर हा एखादा जुन पडक घर असाव अशी दयनिय अवस्था झालेली दिसून येत आहे. कारण की गेटवरच घाणीचे साम्राज्य आतमध्ये गेल्यानंतर काही दुरवस्था झालेल्या रुग्णांसाठीच्या खाटा तिथे दिसून येतील. मात्र त्यावर झोपणे सोडा एखादा रुग्ण बसूही शकणार नाही अशी अवस्था आहे. एकूणच या इमारतीत गेल्या कित्येक वर्षापासून कुणी आले आहे की नाही असा प्रश्न पडावा एवढी वाईट अवस्था या इमारतीची झाली आहे.