

मुंबई : मुंबईमध्ये येत्या काळात सर्क्युलर इकॉनॉमी उभारणार आहोत. मुंबईतील पाणी, हवेची शुद्धता वाढली पाहिजे. सर्क्युलर इकॉनॉमीमुळे त्या दिशेने प्रयत्न सुरू होतील. या उपक्रमातून एक-दोन वर्षांतच मुंबईतील हवेची आणि पाण्याच्या गुणवत्तेत आपल्याला फरक दिसायला लागेल. तसेच पाच-सहा वर्षांत शाश्वत विकासापर्यंत आपण पोहोचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दावोस येथून महाराष्ट्रातील माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सर्क्युलर इकॉनॉमीच्या उपक्रमाची आवश्यकता विशद केली. सर्क्युलर इकॉनॉमी ही मुंबईसाठी मोठी भेट ठरणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्र हे महाराष्ट्रासह देशाचे ग्रोथ इंजिन ठरणार आहे.
दावोस तेथील बैठकांतून व्यवसायांचे, उद्योगांचे बदलते स्वरूप लक्षात येते. मागील दोन दावोस बैठकांत एआय आणि इनोव्हेशनची चर्चा सुरू आहे. प्रत्येक देशातील बदल येणाऱ्या नव्या औद्योगिक लाटा यातून दिसतात. या बाबी लक्षात घेत भविष्यातील बदलांचा वेध घेत आपल्याकडून यंत्रणा सिद्ध करणे, नव्या बदलांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्यादृष्टीने इनोव्हेशन सिटी आणि ग्रोथ सेंटरचा निर्णय केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून येथील वेस्टचे वेल्थमध्ये रूपांतर केले जाईल. ही सर्व एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या उपक्रमात मुंबई महापालिका पुढाकार घेऊन काम करेलच, पण त्यात खासगी क्षेत्रातूनही गुंतवणूक येईल. हाच प्रयोग पुणे, नागपूरसारख्या शहरांतही राबविण्यात येईल. यामुळे मुंबईसह इतर शहरांचा चेहरामोहराच बदलून जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.