

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील सरकारी आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस, भुवया वरचे केस ब्लेडने कापल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.
तालुक्यातील चास येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये १२ व १५ डिसेंबरला अज्ञात टवाळखोरांनी गाढ झोपेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस आणि भुवया ब्लेडने कापण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक भयभीत झाले आहेत. मात्र हा रॅगिंग चा प्रकार आहे की काही खोडकर मुलांनी खोड्या करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केला आहे याचा तपास सुरू आहे. मात्र हे प्रकरण घडल्यानंतर कायद्याचा धाक राहावा असे प्रकार पूर्ण घडू नये आणि याबाबतची मुलांमध्ये जागृती व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून तात्काळ मोखाडा पोलिसांना बोलून सर्वच मुलांना समज देखील देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
मोखाड्यातील चास या शासकीय आश्रम शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. आश्रम शाळेत ३३१ मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. सदरची आश्रमशाळा निवासी असल्याने या ठिकाणी तब्बल २८० विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था बहुउद्देशीय हॉलमध्ये करण्यात आली आहे. मुलं आणि मुलींची वेगवेगळ्या इमारतीमध्ये निवासाची व्यवस्था आहे. शुक्रवारी १२ डिसेंबरला हा भयानक प्रकार घडला.
१४ वर्षीय मुलगा गाढ झोपेत असताना अज्ञात टवाळखोर पोरांकडून रात्रीच्या वेळेस त्याच्या डोक्यावरील केस व डोळ्याच्या भुवया ब्लेडच्या सहायाने काढल्या त्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. ही बाब शिक्षकांच्या कानावर येताच त्यांनी याबाबतीत सर्व मुलांना बोलावून सूचना दिल्या मात्र दोन दिवसानंतर पुन्हा सोमवारी १५ डिसेंबरला रात्री दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस ब्लेडच्या सहायाने कापण्यात आले.
या दोन विचित्र घटना घडल्यामुळे वस्तीगृहातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुल झोपेत असताना अचानक ब्लेड कुठे दुसरीकडे लागली तर मोठी दर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार नेमका कोण करतय याचा तपास शिक्षक घेत आहेत. मात्र अशा घटनांमुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.